राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, नुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी शालेय शिक्षणासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 जाहीर केला. या आराखडय़ात केलेल्या शिफारशीनुसार बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे.
दोन्ही परीक्षा समान असतील. पहिल्या वेळी कमी गुण मिळाल्याचे वाटल्यास विद्यार्थ्याला दुसऱ्या परीक्षेत श्रेणी सुधारची संधी मिळेल. तसेच बोर्ड परीक्षेत केवळ पाठ केलेली उत्तरे लिहिण्यापेक्षा विद्यार्थ्यांमधील क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारसही या अभ्यासक्रम आराखडय़ात केली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणप्रणालीत मोठय़ा बदलाची घोषणा केली. वर्ष 2024 पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम बदलानुसार पाठय़पुस्तके विकसित केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी महागडय़ा कोचिंग क्लासेसना जाणे आणि घोपंपट्टीची सवय सोडून त्याऐवजी विद्यार्थ्यांमधील क्षमता आणि त्यांच्यातील कामगिरीचे मूल्यांकन करण्याची शिफारस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात करण्यात आली आहे. हिंदुस्थानातील विविध राज्यांत 60 शिक्षण मंडळांमार्फत बोर्डाची परीक्षा (दहावी, बारावी) घेण्यात येअकरावी, बारावी केवळ पारंपरिक शाखांपुरते मर्यादित नाही
अकरावी, बारावीसाठी पारंपरिक आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्ससारख्या पारंपरिक शाखांचा ढाचा नव्या अभ्यासक्रम आराखडय़ात हद्दपार झाला आहे. विद्यार्थ्यांना या इयत्तांमध्ये आपल्या आवडीचे विषय यापुढे निवडता येणार आहेत, मात्र विद्यार्थ्यांना या इयत्तांमध्ये दोन भाषा विषय अभ्यासणे सक्तीचे असून यातील एक भाषा हिंदुस्थानी भाषा निवडावी लागणार आहे.
75 टक्के मूल्यांकन प्रात्यक्षिकांवर आधारित
नवीन अभ्यासक्रम आराखडय़ात व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण आणि शारीरिक शिक्षण हे अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त मूल्यांकन हे प्रात्यक्षिकांवर आधारित असावे. लेखी परीक्षांवर आधारित नसावे, अशी शिफारसही अभ्यासक्रम आराखडय़ात करण्यात आली आहे. परीक्षेतील 75 टक्के वेटेज हे प्रात्यक्षिक परीक्षेवर आधारित तर 25 टक्के वेटेज हे लेखी परीक्षेवर आधारित असावे. तसेच विज्ञान आणि इतर विषयांचे मूल्यांकनही प्रात्यक्षिक परीक्षांवर आधारित असावे.











