पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात करार; २४ महिन्यांत हॉटेल उभारण्याचे नियोजन
देवगड : प्रतिनिधी
सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या हॉटेलची उभारणी करण्यासंदर्भातील करार आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात करण्यात आला. ५० खोल्यांचे हे आलिशान हॉटेल अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, या प्रकल्पामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
सिंधुदुर्गमध्ये शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथे ताज हॉटेल साकारत असल्याने कोकणातील पर्यटन सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच विविध व्यवसायांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासही या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे.
कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. कुणकेश्वरच्या समुद्रकिनारा, धार्मिक पर्यटन आणि निसर्गसौंदर्याला या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आतिथ्य सुविधांची जोड मिळाल्याने देवगडच्या पर्यटन विकासाला नवे आयाम मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे उपस्थित होते.












