देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शिक्षण प्रसारक मंडळातील विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित “शिक्षक व कर्मचारी सन्मान सोहळा: २०२६” उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सन्मान सोहळ्याचा शुभारंभ दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कार्यवाह शिरीष फाटक, डॉ. चंद्रशेखर केदारी, नितीन शेडगे व संतोष कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. सीमा शेट्ये यांनी केले.
श्री. शिरीष फाटक यांनी आपल्या प्रास्ताविकात सोहळ्याचा उद्देश व महत्त्व स्पष्ट करून, सद्यस्थितीतील संस्थेचे शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम तसेच भविष्यात गरजेनुसार होणाऱ्या महत्वपूर्ण बदलांबाबत माहिती दिली. यानंतर देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानित कर्मचाऱ्यांबाबतच्या माहितीचे वाचन प्रा. पिया मोरे यांनी केले. मान्यवरांनी सन्मानित केलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुढील प्रमाणे:-
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय:* ग्रंथपाल प्रा. डॉ. सुभाष मायंगडे व डॉ. अजित देवळे(दोघांना पीएच.डी. पदवी), डॉ. सरदार पाटील, डॉ. सागर संकपाळ, डॉ. हेमंत चव्हाण, डॉ. अमित वराळे, डॉ. मीरा काळे(सर्व संशोधक मार्गदर्शक), डॉ. प्रताप नाईकवाडे(उपकरण संशोधनास आंतरराष्ट्रीय स्तरावरील पेटंट मंजूर व आंतरराष्ट्रीय परिषदेत उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार)
गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय:* उच्च शैक्षणिक अहर्ता संपादन करून शैक्षणिक पात्रतेत मोलाची भर घातल्याबद्दल शिक्षक तुषार बावधने, देवेश जोग, संतोष गवंडी, प्राजक्ता जाधव व प्रियांका शेळके.
अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स: उच्च शैक्षणिक अहर्ता संपादन करून शैक्षणिक पात्रतेत मोलाची भर घातल्याबद्दल शिक्षिका भाग्यश्री तांदळे.
सृजन सायन्स इनोव्हेशन अँड ऍक्टिव्हिटी सेंटर: उत्कृष्ट कर्मचारी: संदीप पर्शराम.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यालय
उत्कृष्ट कर्मचारी: रोशनी कांगणे, विलास तावडे व किरण चाचे.
सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी केला. श्री भागवत यांनी आपल्या मार्गदर्शनात सध्याचे शैक्षणिक वास्तव, भविष्याच्या दृष्टीने कौशल्याधारित शिक्षणाचे असणारे महत्त्व, त्यासाठी संस्थेच्यावतीने केल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण उपाययोजना व महत्त्वपूर्ण बदल, आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांचा अपेक्षित असणारा सहभाग याविषयी भाष्य केले. संस्थेच्यावतीने उपस्थितांसाठी “कौशल्य शिक्षणातून राष्ट्रविकास आणि शिक्षण संस्थांची भूमिका” या विषयावर संतोष कोलते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्री. कोलते यांनी यांनी एन. ई. पी.- २०२० नुसार शैक्षणिक पद्धतीमध्ये झालेले बदल आणि सद्यस्थितीत कौशल्य शिक्षणाचे वाढलेले महत्त्व व गरज विशद केली. शिक्षणाकडे नोकरीचे साधन म्हणून न पाहता, कौशल्य शिक्षणाद्वारे स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करण्यासाठी एमकेसीएलकडे असणाऱ्या उपयुक्त पदविकांची माहिती दिली. एआयच्या साह्याने शेती, मनोरंजन, क्रीडा, कला, हिशोब व लेखांकन, जाहिरात व स्पर्धा परीक्षा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भविष्यामध्ये असणाऱ्या करिअर विषयक संधी अनेक उदाहरणांसह विशद केल्या. सोहळ्याचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी केले. सुरुचीपूर्ण स्नेहभोजनानंतर सोहळ्याची सांगता झाली.












