सिंधुदुर्गाच्या ‘भरडी’ मातीत फुलली सेंद्रिय ड्रॅगन फ्रुट ! 

▪️वेंगुर्ल्याच्या सखाराम ठाकूर यांचा यशस्वी प्रयोग

▪️गांडूळ खत, शेणखत आणि ‘गोकृपा अमृत’चा वापर 

मसुरे | झुंजार पेडणेकर :कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात आंबे, काजू, माड पोफळीच्या बागा आणि हिरवीगार भातशेती. परंतु वेंगुर्ले तालुक्यातील मठ ठाकूरवाडी येथील सखाराम ठाकूर या प्रयोगशील शेतकऱ्याने कोकणाच्या मातीत एक नवा यशस्वी अध्याय लिहिला आहे. पारंपरिक शेतीला फाटा न देता, त्यांनी केवळ एका झाडापासून सुरू केलेल्या प्रयोगातून आज एकाच वर्षात ६० ते ७० ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेण्याची थक्क करणारी किमया साधली आहे. प्रायोगिक तत्वावर त्यांनी नवीन लागवड सुद्धा केली आहे ज्याची फळधारणा आता सुरु झाली आहे.

▪️प्रयोगाची सुरुवात आणि जिद्दीचा प्रवास-

सन २०२० मध्ये ठाकूर यांच्या भाच्याने त्यांना ड्रॅगन फ्रुटचे एक छोटे रोप आणून दिले. केवळ एक प्रयोग म्हणून त्यांनी ते आपल्या जमिनीत लावले. सुरुवातीची दोन वर्षे (२०२२ पर्यंत) या झाडाला एकही फळ आले नाही. मात्र ठाकूर यांनी हार मानली नाही. २०२३ मध्ये जेव्हा झाडाला पहिली चार फळे आली, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी या झाडाची अधिक काळजी घेण्यास व त्यावर मेहनत घेण्यास सुरुवात केली.

पूर्णपणे सेंद्रिय व्यवस्थापन

कोणत्याही तज्ज्ञाचे मार्गदर्शन उपलब्ध नसताना, केवळ स्वतःचा अनुभव आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी या झाडावर आजतागायत एक थेंबही रासायनिक फवारणी केलेली नाही. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत त्यांनी गांडूळ खत, शेणखत आणि ‘गोकृपा अमृत’चा वापर केला. सेंद्रिय खतांच्या बळावर या परदेशी फळाच्या झाडाने सिंधुदुर्गाच्या स्थानिक वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेतले आहे. आधारासाठी ड्रॅगन फ्रुट च्या रोपाना लाकडी बांबू चा चौफुला बनविला आहे. त्यामुळे खर्चात बचत झाली आहे. सध्या बाजार भावात ड्रॅगनफ्रूट चा दर 300 रुपये प्रति किलो असून मध्यम आकारची तीन ते चार फळे एक किलो मध्ये येतात.

▪️सिंधुदुर्गातील वातावरणासाठी ड्रॅगन फ्रुट योग्य

सखाराम ठाकूर यांच्या मते, ड्रॅगन फ्रुट हे मुळात निवडुंग प्रजातीतील झाड असल्यामुळे याला पाण्याचा खप खूप कमी असतो.या पिकासाठी पाणी साचून न राहता सहज निघून जाणारी (निचरा होणारी) जमीन आवश्यक असते. कोकणातील स्थानिक भाषेत ज्याला ‘भरडी जमीन’ म्हणतात, ती या पिकासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

पाण्याचा कमी वापर आणि सेंद्रिय पद्धतीने होणारी वाढ यामुळे कोकणात ड्रॅगन फ्रुटची शेती उत्तम प्रकारे होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

▪️भविष्यातील व्यावसायिक नियोजन-

सखाराम ठाकूर यांचा मूळ व्यवसाय शेती हाच असून त्यांच्याकडे आंबा, काजूच्या बागा आणि थोडी भातशेती आहे. आतापर्यंत त्यांनी या ड्रॅगन फ्रुटची विक्री केलेली नाही; परंतु या प्रयोगाच्या अभूतपूर्व यशानंतर भविष्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करून व्यावसायिक तत्त्वावर विक्री करण्याचा त्यांचा मानस आहे. इतर शेतकऱ्यांनाही या शेतीचा लाभ व्हावा यासाठी ठाकूर यांनी ड्रॅगन फ्रुटची उत्तम दर्जेदार रोपे तयार करण्यास सुरुवात केली असून, ती अवघ्या १५० रुपये प्रति रोप या दराने उपलब्ध करून दिली आहेत.

कोकणातील बदलत्या हवामानात आणि पारंपरिक पिकांच्या अनिश्चिततेच्या काळात सखाराम ठाकूर यांनी उभारलेला हा प्रयोग नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरणारा आहे. भरडी जमिनीचा योग्य वापर करून सेंद्रिय ड्रॅगन फ्रुट शेतीकडे वळल्यास कोकणातील शेतकरी आर्थिक प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत करू शकतात, हेच ठाकूर यांनी आपल्या कष्टाने सिद्ध केले आहे. अधिक माहिती साठी सखाराम ठाकूर यांच्या ( 94208 23165 ) या क्रमांकावर संपर्क साधावा.