देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली माळवाडी येथील पालकर फाऊंडेशन विभागात ज्येष्ठ नागरिकांचे जमा झालेले पैसे ठेवण्यात आले असताना त्यातील ५० हजार २०० रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाला असून त्याच्याविरुद्ध देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवरूख पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकर फाऊंडेशनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे एकूण ७८ हजार ८०० रुपये जमा झाले होते. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास राकेश एकनाथ मेस्त्री (वय ३२, रा. काटवली ढोसळवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याने फाऊंडेशनच्या काउंटरमधून ५० हजार २०० रुपयांची रोकड चोरून नेल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या १०० नोटा आणि २०० रुपयांची एक नोट होती.
घटनेनंतर पालकर फाऊंडेशनचे मॅनेजर श्रीकृष्ण धोंडू पालेकर (वय ४४, सध्या रा. पालकर फाऊंडेशन, विघ्रवली माळवाडी; मूळ रा. इळये वरंडवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांनी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार राकेश मेस्त्री याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३, ३०६ तसेच IPC कलम ३७८, ३८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलीस करीत आहेत.











