गणरायाच्या चरणी नतमस्तक होत आ. शेखर निकम यांची सार्वजनिक गणेश मंडळांना भेट

चिपळूण (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सालाबादप्रमाणे यावर्षीही चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मंडळांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
चिपळूण शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आकर्षक सजावट, धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी आ. शेखर निकम यांनी नमूद केले. शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देताना आमदार निकम यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेत त्यांनी कार्यकर्त्यांशी आपुलकीने संवाद साधला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि लोकसहभाग वाढविण्याचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवक मोठ्या संख्येने एकत्र येऊन विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. समाजातील गरजू घटकांना मदत, आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याबद्दल आमदार निकम यांनी मंडळांचे अभिनंदन केले.
गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम राखत साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणरायाच्या कृपेने चिपळूण शहरासह संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो, अशी प्रार्थना त्यांनी केली. आमदार शेखर निकम यांच्या या गणेश मंडळ भेटीमुळे कार्यकर्ते व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.