गणेश मंडळांना भेट देत प्रशांत यादव यांनी घेतले गणरायाचे दर्शन

चिपळूण (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त चिपळूण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विविध सार्वजनिक गणेश मंडळांना राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून भेटी दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी चिपळूण शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देत श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून गणेशोत्सवाच्या आयोजनाची माहिती जाणून घेतली. प्रशांत यादव यांनी महावितरणच्या गणेशोत्सव मंडळालाही भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, एकोपा आणि सकारात्मक उपक्रमांना चालना मिळावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशांत यादव यांचे स्वागत केले. या स्वागताबद्दल यादव यांनी मंडळ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा वाढविण्याचे आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणण्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. या भेटीप्रसंगी भाजपचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, चिपळूणच्या उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका रसिका देवळेकर, वैशाली निमकर, शितल रानडे, युवा वॉरिअर प्रकोष्ठचे जिल्हा संयोजक अभिषेक जागुष्ट्ये, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल आंबेकर, शहर मंडल सरचिटणीस सारिका भावे, युवा मोर्चा उपाध्यक्ष सर्वेश सुर्वे, अमोल तटकरे, नरेंद्र बेळवकर, विलास चव्हाण, जगदीश गोरिवले आदी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध मंडळांना भेटी देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या माध्यमातून भाजपच्या स्थानिक संघटनेचा जनसंपर्कही अधिक दृढ होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.