वेंगुर्ल्यानंतर कुणकेश्वरमध्येही ‘ट्री ऑफ लाईफ’ ताज हॉटेल प्रकल्प ; पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांच्याकडून स्वागत
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या वाटचालीत एक नवा ऐतिहासिक अध्याय सुरू झाला आहे. वेंगुर्ल्यानंतर आता देवगड तालुक्यातील प्रसिद्ध आणि पवित्र कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ (Tree of Life – IHCL) या ताज समूहाच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचा मार्ग अधिकृतपणे पूर्णत्वास आला आहे. एकामागून एक दोन जागतिक दर्जाचे पंचतारांकित प्रकल्प सिंधुदुर्गात येत असल्याने सिंधुदुर्ग पर्यटन विकासात ऐतिहासिक, क्रांतिकारी आणि सुवर्णमय पर्व ठरले असल्याचे सांगत पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे.
राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्गातील ‘ताज’ समूहाच्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. स्थानिक भूमिपुत्र आणि जमीनधारकांना विश्वासात घेऊन त्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्याच्या भूमिकेतून वेंगुर्ला येथील वेळाघर-शिरोडा येथे प्रस्तावित पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला. मंत्रालयात झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे या प्रकल्पाला अधिकृत दिशा मिळाली.
यानंतर आता देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज समूहाच्या दुसऱ्या पंचतारांकित प्रकल्पासाठी अधिकृत स्वाक्षरी झाल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पर्यटन क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
‘ट्री ऑफ लाईफ’मुळे उच्च श्रेणीतील पर्यटकांना आकर्षण
ताज समूहाच्या अंतर्गत येणारा ‘ट्री ऑफ लाईफ’ हा बुटीक रिसॉर्ट ब्रँड निसर्गरम्य वातावरण, शांतता, गोपनीयता, स्थानिक वास्तुकला आणि उच्च दर्जाच्या आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. गर्दीपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात विश्रांतीचा अनुभव देणाऱ्या या संकल्पनेमुळे देवगड-कुणकेश्वर परिसराकडे देश-विदेशातील उच्च श्रेणीतील आणि निसर्गप्रेमी पर्यटक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे केवळ हॉटेल व्यवसायालाच नव्हे, तर स्थानिक पर्यटन व्यवसायाच्या विविध घटकांना चालना मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक, पर्यटन मार्गदर्शक, महिला बचत गट, हस्तकला व कुटीर उद्योग, गृहउद्योग यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
खासदार नारायण राणेंच्या पर्यटन संकल्पनेला पुढची दिशा
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिल्पकार खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी दूरदृष्टीने प्रयत्न केले. सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित झाल्या नंतर खऱ्या अर्थाने पर्यटन वाढले. निसर्गाची उदंड संपदा, विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध कोकणी संस्कृती यामुळे जिल्ह्याला पर्यटनाच्या क्षेत्रात मोठी क्षमता लाभली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठे पर्यटन प्रकल्प जाहीर होऊन ते प्रत्यक्षात येण्याची प्रक्रिया आता वेग घेत असल्याचे चित्र आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि सिंधुदुर्ग राष्ट्रीय पर्यटन नकाशावर यावा, या संकल्पनेला आता मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून पुढची दिशा मिळत असल्याचे सांगण्यात आले.
तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्पांसाठी पाठपुरावा केला. विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकल्प प्रत्यक्षात येत असल्याचे पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींनी नमूद केले.
‘रिव्हर्स मायग्रेशन’ला मिळणार चालना
पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’च्या संकल्पनेच्या दृष्टीनेही हे प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत. रोजगारासाठी मुंबई, पुणे, देशातील इतर शहरांमध्ये किंवा परदेशात गेलेल्या कोकणातील युवकांना स्थानिक पातळीवर दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास या प्रकल्पांमुळे मदत होऊ शकते.
जागतिक दर्जाच्या पर्यटन प्रकल्पांमुळे पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक पर्यटन व्यवसायाची उलाढाल वाढण्यासोबतच वाहतूक, खाद्यपदार्थ, मार्गदर्शन सेवा, हस्तकला, स्थानिक उत्पादने आणि विविध सेवा क्षेत्रांना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
पायाभूत सुविधांनाही मिळणार चालना
मोठ्या पर्यटन प्रकल्पांच्या माध्यमातून परिसरातील रस्ते, वीज, पाणी आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळू शकते. त्यामुळे पर्यटनासोबतच स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या संधींना बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी जिल्ह्यात एकामागून एक दोन जागतिक दर्जाचे ‘ताज’ प्रकल्प येत असल्याबद्दल महायुती सरकारचे आणि विशेषतः पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
“या प्रकल्पांमुळे सिंधुदुर्ग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल. स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि विविध घटकांना रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. कोकणच्या विकासाची ही घोडदौड अशीच सुरू राहून सिंधुदुर्ग देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनेल,” असा विश्वास विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला.












