सावंतवाडी :
मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव येथील जोशी-मांजरेकरवाडी सर्कलजवळ बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार नामदेव उमेश आजगावकर (वय १८, रा. मळगाव, आजगांवकरवाडी) या युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुर्वेश शेर्लेकर (वय १८, रा. मडुरा) हा गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव आजगावकर हा आपल्या नातेवाईकासह दुचाकीने (क्र. एम एच ०५ जी एम ४०६१) मळगाव बाजाराच्या दिशेने जात होता. जोशी-मांजरेकरवाडी सर्कलवरून रस्ता ओलांडत असताना कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टाटा पंच कारने (क्र. एम एच ०७ एजी ८१२३) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही युवक कारच्या बोनेटवर आपटून १५० ते २०० फूट फरफटत गेले.
उपचारादरम्यान मृत्यू; साथीदार गोव्याला हलवला
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते संजय जोशी, शिवम जोशी, बाळा आरोंदेकर, अजय राऊळ, विराज गोसावी, पांडुरंग हळदणकर, सिद्धेश आजगावकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, श्याम हळदणकर, शंकर केरकर, शंकर खडपकर, माजी सरपंच हनुमंत पेडणेकर आदींनी मदतकार्य करत १०८ रुग्णवाहिकेने जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नामदेव आजगावकर याला मृत घोषित केले. जखमी दुर्वेश शेर्लेकर याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी (गोवा) येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे, पोलीस हवालदार धोत्रे, अनिल धुरी, कोरगांवकर आणि पोलीस पाटील साईश केरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघातग्रस्त कार चालक प्रियेश चद्रकांत तळवडेकर ( ३३, रा. माजगांव नाला ता. सावंतवाडी ) याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मळगाववर शोककळा
मृत नामदेव आजगावकर हा उत्तम कलाकार होता. त्याने ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘वेतोबा’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी आणि चुलत भाऊ असा परिवार आहे. ऐन उभारीच्या वयात झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे आजगावकर कुटुंबावर आणि संपूर्ण मळगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.













