डीवायएसपी दीपक शेलार यांनी मालवण पोलीस ठाणे प्रभारी पदभार स्वीकारला

अमित खोत | मालवण : परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) दीपक शेलार यांनी मालवण पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच आगामी पोलीस मोहिमांबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून अकरा दिवसांच्या गणपती तसेच अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन शेलार यांनी केले. विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर करू नये, तसेच गणेशभक्तांनी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन मिरवणुका काढाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने विविध विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. अवैध धंदे, बेकायदेशीरपणे वाहने चालवणे, बेकायदेशीर वाहतूक, नशाबंदी तसेच अंमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांचे सुरुवातीला समुपदेशन व जनजागृती करण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास संबंधित पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले.

शहरात कुठेही अवैध धंदे किंवा नियमबाह्य वाहतूक सुरू असल्यास नागरिकांनी तत्काळ मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येतील, असे दीपक शेलार यांनी सांगितले.

“पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. मालवण शहर स्वच्छ, निरोगी आणि नशामुक्त ठेवणे हे आमचे ध्येय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार कर्तव्य बजावतील. मालवणमध्ये नागरिकांच्या दृष्टीने तसेच पर्यटनाचे चांगले वातावरण निर्माण करून शहराच्या विकासाला हातभार लावण्याचे आमचे नियोजन आहे,” असे दीपक शेलार यांनी स्पष्ट केले.

पोलीस प्रशासन जनतेच्या सेवेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असून विविध मोहिमांमध्ये मालवणच्या सुजाण नागरिकांचे सहकार्य लाभेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.