हवामानातील बदलाचा भातशेतीला फटका

पावसाने दडी मारल्याने कडक उन्हाचा तडाखा 

शिरगाव (प्रतिनिधी) :    हवामानातील बदलाचा यंदाच्या खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पाऊस कमी आणि उशिरा झाल्याने भाताची पेरणी लांबली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा खर्च करून केलेली शेती संकटात सापडली आहे.

सध्या भातपीक पोटरीच्या अवस्थेत असून, पावसाअभावी पोटरी धरण्याची प्रक्रिया मंदावली आहे. कडक उन्हामुळे पोटरीतच भातपिकाला ऊबसा येऊन पाऊस न झाल्यास पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच लवकर पेरणी झालेल्या काही भातपिकांमध्ये पोसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, दाणे भरण्याच्या अवस्थेत आवश्यक ओलावा मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी कडक उन्हामुळे भातपीक करपण्यास सुरुवात झाली असून, पाऊस नसल्याने शेतकरी पंपाद्वारे पाणी देऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

भाताबरोबरच नाचणी, कुळीथ, उडीद आणि भुईमूग यांसारख्या खरीप पिकांनाही पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. त्यातच वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भर पडल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.

याबाबत शासनाने खरीप पिकांची तातडीने पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळसदृश स्थिती जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.