मालवणमध्ये २८ नोव्हेंबरला स्थानिक कवी-कवयित्रींचे संमेलन!

सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनानिमित्त नवोदित व प्रस्थापित कवींना हक्काचे व्यासपीठ

स्वरचित कविता सादर करण्याची संधी; उत्स्फूर्त सहभागाचे अध्यक्ष डॉ. देवदत्त परुळेकर यांचे आवाहन

अमित खोत | मालवण : मालवण व परिसरातील नवोदित तसेच प्रस्थापित कवी-कवयित्रींच्या साहित्यिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी खुले स्थानिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन – २०२६ च्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात स्थानिक कवी-कवयित्रींना आपल्या स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. या साहित्यिक सोहळ्यात मालवण व परिसरातील कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सेवांगणचे अध्यक्ष डॉ. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनांतर्गत २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, चिवला बीच, मालवण येथे खुले स्थानिक कवी संमेलन होणार आहे.

 

स्थानिक साहित्यिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे, काव्यलेखनाची आवड जोपासणे तसेच नवोदित कवींना आपले साहित्य रसिकांसमोर सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या संमेलनातून मालवणच्या साहित्यविश्वातील विविध काव्यप्रवाहांना उजाळा मिळण्याबरोबरच नव्या लेखनप्रतिभेलाही संधी मिळणार आहे.

 

या कवी संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी-कवयित्रींनी आपली स्वरचित कविता व संक्षिप्त परिचय ऋतुजा केळकर यांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९४२०४ २३७९० वर पाठवून नावनोंदणी करावी. मालवण व परिसरातील अधिकाधिक नवोदित आणि प्रस्थापित कवी-कवयित्रींनी या साहित्यिक उपक्रमात सहभागी होऊन संमेलनाची शोभा वाढवावी, असे आवाहन सेवांगणचे अध्यक्ष डॉ. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.