सातोळी बावळाट येथे तब्बल ३७ लाख ८० हजारांची बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू जप्त

सावंतवाडी पोलिसांची कारवाई : आयशर टेम्पोसह दोघे ताब्यात 

सावंतवाडी । प्रतिनिधी :बांदा-आंबोली मार्गावर सातोळी-बावळाट येथे सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत ३७ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असलेली २२ लाख ८० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि १५ लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना रंगेहाथ अटक केली असून एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सावंतवाडी पोलिसांनी माहितीनुसार, बांदा ते आंबोली जाणाऱ्या रस्त्यावर सातोळी-बावळट येथे एका आयशर टेम्पोमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आयशर वाहनाची (क्रमांक MH-45 AF-1540) तपासणी केली. या वेळी वाहनात पुठ्ठ्याचे तब्बल ३८० बॉक्स मिळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येकी ५०० रुपये किमतीच्या ‘रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्की’ नावाच्या गोवा बनावटीच्या दारूच्या ७५० मिलीच्या १२ प्लास्टिक बाटल्या बंदिस्त होत्या. या दारूची एकूण किंमत २२ लाख ८० हजार रुपये आहे.

या कारवाईदरम्यान वाहनातील आरोपी एकनाथ सुखदेव इंगोले (वय २६, रा. बामनी, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि भिमराव बंडू शेटे (वय २६, रा. सिकंदर टाकळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार प्रवीण दत्ताराम खांडेकर (वय २७, रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा महाराष्ट्राची हद्द सुरू झाल्यावर वाहनाच्या पाठीमागून येऊन रस्त्यात उतरून पसार झाल्याचे समोर आले आहे. या तिघांनी संगनमत व कट रचून गैरकायद्याने व विनापरवाना या दारूची वाहतूक चालवली होती.

सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (अ) (ई), ८१ व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील तसेच जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक मुल्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करत आहेत.