संगीत हे धावपळीच्या जीवनातील ‘रामबाण औषध’: आमदार प्रेमेंद्र शेट

सावंतवाडीत २०व्या ‘सम्राट संगीत सितारा’ प्राथमिक फेरीचे दिमाखात उद्घाटन

सावंतवाडी । प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात संगीत हे मनाला शांती देणारे एक रामबाण औषध आहे. देवाशी, भावनांशी आणि मनाशी नाते जोडण्याचे सामर्थ्य संगीतात असून, सम्राट क्लब इंटरनॅशनलने ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ च्या माध्यमातून नवीन कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे,” असे गौरवद्गार गोव्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी काढले.

सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात, सम्राट क्लब इंटरनॅशनल (राज्य-१) आणि सम्राट क्लब मये यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०व्या ‘सम्राट संगीत सितारा’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार शेट (मये मतदारसंघ, गोवा व चेअरमन, फलोत्पादन महामंडळ) प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मातृदिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ मातेला वंदन करण्यात आले. आपल्या भाषणात आमदारांनी अजित कडकडे आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांचा उल्लेख केला. कलेत प्राविण्य मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रमांची गरज असते. प्राचीन काळापासून राजे-महाराजे सुद्धा दुःख निवारणासाठी संगीताचा आधार घेत असत, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

या सोहळ्याला सम्राट क्लबचे अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. ज्यामध्ये प्रामुख्याने सम्राट क्लब इंटरनॅशनल (राज्य-१) अध्यक्ष शशिकांत पुनाजी, सचिव विनोद मळीक, खजिनदार सुबोध रामनाथकर, सम्राट क्लब मये अध्यक्ष नरेश पेडणेकर, स्टेट वनचे अध्यक्ष पांडुरंग दादा, परीक्षक सौ. आमोणकर, निखिल साळगांवकर, स्वप्ना मातोंडकर, विवेकानंद नार्वेकर, मंगेश गांवकर, कालिदास कोळेकर व अन्य सभासद उपस्थित होते.

नव्या कलाकारांना प्रोत्साहन
सम्राट क्लबतर्फे आयोजित ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा नसून ती कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देणारी एक चळवळ आहे. गेल्या २० वर्षांची ही परंपरा यापुढेही अशीच सुरू राहील आणि यातून ग्रामीण भागातील हिरे चमकतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

या प्राथमिक फेरीला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सावंतवाडी येथील तबला कलाकार किशोर सावंत आणि निलेश मेस्त्री, तबला वादक निरज भोसले यांनी गायक कलाकारांना साथसंगत केली. या स्पर्धेच्या पुढील फेऱ्या गोवा आणि बेळगाव येथे होणार असून, अंतिम फेरी गोवा कला अकादमी येथे रंगणार आहे