दांडी बीच येथे विशेष स्वच्छता मोहीम

महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांच्या पुढाकारातुन किनारा चकाचक

मालवण | प्रतिनिधी : दांडी बीचवर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आल्याने स्थानिक मच्छिमार तसेच पर्यटकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. किनाऱ्यावर आलेल्या या कचऱ्यामुळे मासेमारीच्या कामात अडथळे निर्माण होत होते, तर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या दांडी बीचचे सौंदर्यही झाकोळले होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन तसेच २७ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक पर्यटन दिना’चे औचित्य साधून महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी पुढाकार घेत नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने विशेष स्वच्छता मोहीम राबविली.

 

सकाळच्या सत्रात स्थानिक मच्छिमार नेहमीप्रमाणे बोटी घेऊन मासेमारीसाठी समुद्रात गेले असता कचरा त्यांच्या जाळ्यांमध्ये अडकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मच्छिमारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याचबरोबर पर्यटन हंगाम सुरू असल्याने दांडी किनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. किनाऱ्यावर पसरलेल्या कचऱ्यामुळे पर्यटकांच्या अनुभवावर परिणाम होण्याची शक्यता होती.

 

ही बाब लक्षात घेऊन अन्वेषा आचरेकर यांनी तातडीने पालिका प्रशासनाशी संपर्क साधत स्वच्छता मोहीम हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दांडेश्वर मंदिर परिसर ते दांडी आवार या संपूर्ण समुद्रकिनाऱ्याची विशेष स्वच्छता करण्यात आली. किनाऱ्यावर साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

 

यावेळी अन्वेषा आचरेकर यांनी सांगितले की, “दांडी किनारा हा मालवणमधील प्रमुख आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला परिसर आहे. तसेच स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचे हे मुख्य केंद्र आहे. जमा झालेल्या कचऱ्यामुळे मच्छिमारांना काम करणे कठीण जात होते आणि पर्यटकांच्या दृष्टीनेही हे अयोग्य होते. त्यामुळे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून आम्ही ही मोहीम तातडीने राबवली आहे. पर्यटन वृद्धीसोबतच किनाऱ्याचे पर्यावरण टिकवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.”

 

२७ सप्टेंबर रोजी जगभरात ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा केला जातो. मालवण हे कोकणातील एक प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने येथील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर दांडी बीचवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे स्थानिक मच्छिमार, नागरिक आणि पर्यटकांनी स्वागत केले.

 

मच्छिमारांची निर्माण झालेली अडचण दूर करण्यासोबतच पर्यटकांना स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल स्थानिक मच्छिमार, नागरिक आणि पर्यटकांनी महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर तसेच नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.