कृषी विभाग व महसूल प्रशासनाकडून कोळंब, कुंभारमाठ परिसरात नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी
मसुरे | झुंजार पेडणेकर
चालू खरीप हंगामात मालवण तालुक्यामध्ये पावसाने चारही महिन्यांत मोठा खंड दिल्याने व सरासरीच्या तुलनेत पाऊस अत्यंत कमी झाल्याने तालुक्यातील भातशेती संकटात सापडली आहे. मालवण तालुक्यात २३ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या केवळ ६९ टक्के इतकाच पाऊस नोंदवला गेला आहे. पावसाच्या या मोठ्या तुटवड्यामुळे व पाण्याच्या ताणामुळे तालुक्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, झालेल्या नुकसानीचा अचूक अंदाज घेण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने तालुक्यात प्राथमिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी मालवणचे तहसीलदार श्री. गणेश लव्हे व तालुका कृषी अधिकारी श्री. अमोल करंदीकर यांनी संयुक्तपणे तालुक्यातील कोळंब व कुंभारमाठ परिसरातील बाधित शेतांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.
या प्रक्षेत्र भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी पाण्याच्या ताणामुळे सुकलेल्या व नुकसान झालेल्या भात पिकाची पाहणी केली, तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व परिस्थिती जाणून घेतली. नुकसानीचे पंचनामे आणि सर्व्हेक्षणाचे काम गतीने पूर्ण करून शासनाला अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या पाहणी दौऱ्यावेळी महसूल मंडळ अधिकारी श्रीम.मिनल चव्हाण, कोळंबच्या सरपंच श्रीम. सिया धुरी, कोळंब तलाठी श्रीम. शिवलकर, कृषीसेवक श्री. विवेक रंगे, श्री. किशोर कदम तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री. भूपेश ढोलम यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.












