लायन्स क्लब मालवणचा सेवाभावी उपक्रम
लायन्स क्लबच्या उपक्रमास भाविकांकडून प्रतिसाद
मालवण | प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मालवण बंदर जेटी येथे गणेश विसर्जनावेळी निर्माल्य संकलनाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. गणेशभक्तांकडून फुले, हार, फुलपत्री आदी निर्माल्य श्रद्धेने स्वीकारून ते मालवण नगरपालिकेच्या निर्माल्य कलश माध्यमातून पुढील प्रक्रियेसाठी जमा करण्यात आले. लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या मार्गदर्शनात विविध यशस्वी उपक्रमा सोबत हा ही उपक्रम उपस्थित सर्व पदाधिकारी सदस्य यांनी यशस्वी राबवला.
गणेशोत्सव काळात अनंतचतुर्दशी पर्यंत लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य मालवण बंदर जेटी येथे उपस्थित होते. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांकडून त्यांनी निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित केले. त्यामुळे विसर्जनस्थळी निर्माल्याचा कचरा होण्यास प्रतिबंध करण्यासोबतच पर्यावरणपूरक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यास हातभार लागला.
गणेशभक्तांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पूजेमध्ये वापरलेले फुले, हार व फुलपत्री लायन्स क्लबच्या सदस्यांकडे सुपूर्द केली. संकलित करण्यात आलेले निर्माल्य मालवण नगरपालिकेच्या निर्माल्य कलशामध्ये जमा करण्यात आले.
गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्सव असतानाच पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारीही प्रत्येकाची आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ मालवण पदाधिकारी सदस्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब मालवणच्या खजिनदार सौ. राधिका मोंडकर, सदस्य सौ. जयश्री हडकर, मुकेश बावकर, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, गणेश प्रभूलकर, मनाली दळवी आदींसह क्लबचे सदस्य उपस्थित होते.












