रत्नागिरी : प्रतिनिधी
गणेश विसर्जन दरम्यान गणेशमुर्तीवर सोड्याची बॉटल फेकून मारत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृध्दाला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली. ही संतापजन घटना शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी रात्री 9 वा.सुमारास शहरातील झारणी रोड परिसरात घडली आहे.
शमशूद्दीन अब्दुल मुजावर (70 मुळ रा.कवठे पिराण ता.मिरज,सांगली सध्या रा.झारणी रोड,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात सागर चक्रधर दळी (45,रा.डी.एस.पी बंगल्यामागे,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री ते त्यांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मिरवणूक घेउन जात असताना संशयिताने झारणी रोड येथील जामा मस्जिद समोरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन त्याच्याकडील दारुचा वास येत असलेली आणि मांसाहारी पदार्थ लावलेली सोडा बॉटल मिरवणूकीमध्ये गणपतीच्या मुर्तीवर फेकून मारली.
त्यानंतर फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना हातवारे करुन चिथावणी देउन त्यांच्यावर हसून त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी संशयिताला तातडीने अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 196(2),299,300 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले होते.











