चिपळूण-संगमेश्वरमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करणार- प्रशांत यादव

दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या चिंतन बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा

चिपळूण (प्रतिनिधी) : “केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांचा लाभ तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासोबतच गावपातळीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात संघटनेची बांधणी मजबूत करून पक्षाच्या विचारधारेसोबत अधिकाधिक नागरिकांना जोडण्यावर भर देण्यात येणार आहे,” असे प्रतिपादन भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.

भाजपा आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ चिंतन बैठक चिपळूण शहरातील स्वागत सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल, गावपातळीवरील पक्षबांधणी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांचा प्रभावी प्रचार-प्रसार तसेच पक्षाच्या आगामी कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सांगितले की, भाजपची खरी ताकद ही बूथ आणि गावपातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपल्या कार्यक्षेत्रात सक्रिय राहून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना आणि विकासकामांची माहिती केवळ कागदोपत्री न राहता ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजनांचा अभ्यास करून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाला व्यापक स्वरूप देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. सेवा, जनसंपर्क आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. गावनिहाय कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे, बूथस्तरावर संपर्क वाढविणे, नव्या कार्यकर्त्यांना संघटनेत संधी देणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे या बाबींवरही चर्चा करण्यात आली.

पक्ष संघटनेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम केल्यास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी काळातील प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन गावपातळीपासून करण्याची आवश्यकता असून, कार्यकर्त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, असेही आवाहन करण्यात आले.

बैठकीला जिल्हा परिषद सदस्य प्रमोद आधटराव, ओबीसी संपर्क प्रमुख संतोष नलावडे, भाजपा रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष लियाकत शाह, देवरुख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, मंडळ अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, संगमेश्वर मंडळ अध्यक्ष विनोद म्हस्के, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष डॉ. रुपाली दांडेकर यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.