कौशल्य शिक्षण आजच्या काळाची गरज- प्रशांत यादव

चिपळूण (प्रतिनिधी) : यशवंत शिक्षण संस्था, भोम संचालित महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोम विद्यालयात नुकतेच भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते व्यवसाय कौशल्य कार्यशाळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष प्रकाशशिर्के, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिर्के, बळीराम मोरे उपाध्यक्ष कोंढेचे माजी सरपंच शशिकांत साळवी, संस्था संचालक महेश सुर्वे, यशवंत गोरीवले, सचिव प्रशांत शिर्के, सरपंच, पोलीस पाटील, व्यावसायिक, प्रतिष्ठित ग्रामस्थ, शेतकरी, पालक, युवक उपस्थित होते.
आपली शेती टिकवा व शेती पूरक व्यवसायाची कास धरा, कौशल्यक्षम युवक बना, परिस्थितीचे भान ठेऊन काम करा. आपली आवड जपा व पूर्ण करा, जपानसारखे इतर देशाचे तंत्रज्ञान आत्मसात करा. कौशल्य व श्रमावर आधारित छोटे-छोटे व्यवसाय सुरु करा. कोकणात सहकार तत्वावर चालणारी वशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे माध्यमातून रोजगार निर्मिती लक्षात घ्या. या उद्योगावर आधारित कौशल्य मिळवा. आजची युवा पिढी कौशल्य शिक्षणाने घडवली पाहिजे याचे महत्त्व लक्षात घेऊनच ग्रामीण व दुर्गम भागात हे अत्यंत महत्वाचे काम यशवंत शिक्षण संस्था, भोम करीत आहे. या शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे मार्गदर्शनपर आवाहन प्रशांत यादव यांनी केले.
व्यवसाय कौशल्य कार्यशाळेसाठी लागणारी मदतीचे आश्वासनही श्री यादव यांनी दिले. भोम विद्यालयात इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना दुसरे सत्रात (दिवाळी सुटीनंतर) कार्यशाळेत सुतारकाम, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, गवंडीकाम, प्लंबिंग, बार बेन्डींग, मेहंदी व ब्युटीपार्लर, आदी कौशल्य शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यातून कुशल तरुण घडवण्याचा शाळेचा मानस आहे. यावेळी प्रशांत यादव, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम, माजी सरपंच शशिकांत साळवी संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी प्रास्ताविक मुख्याध्यापक तानाजी कांबळे यांनी केले. शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, १० वी व १२ वी परीक्षाचा १०० टक्के निकाल, व्यावसायिक कौशल्य कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य व विद्यालयाची गरज याबाबतीत विवेचन केले. कार्यशाळेत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्याचा आढावा शिक्षक धनाजी देसाई यांनी घेतला.
कार्यक्रमासाठी कापरेचे जेष्ठ नागरिक रमाकांत भुर्के, महसूल विभागाचे निवृत्त अधिकारी सुभाष मोरे, उपसरपंच दगडू कदम, भोम, कापरे, पोसरे, दोणवली, मालदोली, गांग्रई, बिवली, वैजी, गावातील ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, पालक, आजी-माजी विद्यार्थी, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन, वृत्तांकन शिक्षक गणेश सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.