पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासोबत खासदार नारायण राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची झाली बैठक
असलेल्या पाण्याचे नियोजन, पाणी अडविणे, पाण्याचे संगोपन तसेच पाणी जमिनीत जिरविण्यासाठी केल्या जाणार उपाय योजना
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात पाणी फाउंडेशनचे प्रमुख सल्लागार व ग्रामीण सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्यासोबत खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी चर्चा केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन गावपातळीवर पाण्याचे नियोजन, पाणी अडविणे, पाण्याचे संगोपन तसेच पाणी जमिनीत जिरविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील पाणी वाटप समित्यांना योग्य प्रशिक्षण देणे, उपलब्ध पाण्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे, यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन घेण्याबाबतही चर्चा झाली.
डॉ. अविनाश पोळ यांनी ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दीर्घकाळ काम केले असून, दुष्काळग्रस्त गावांमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबविण्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्याचा विचार यावेळी मांडण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईचा केवळ तात्पुरता सामना न करता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णायक पावले उचलली जावीत, अशी भूमिका खासदार नारायण राणे यांनी मांडली. प्रशासनानेही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची भूमिका स्पष्ट केली.
लोकसहभाग, प्रशासन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजना उभारण्याच्या दिशेने या चर्चेकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.












