ऑनलाइन देयक सेवेत देवरुखचे पोलीस अंमलदार सागर मुरुडकर राज्यात प्रथम

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याहस्ते विशेष सन्मान

देवरूख (प्रतिनिधी):

शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाइन देयक सेवा नागरिकांपर्यंत अत्यंत जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी पोलीस दलातील देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सागर विजय मुरुडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.

​‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून शासकीय सेवांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत विनासायास आणि वेळेत पोहोचवण्यासाठी सागर मुरुडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळेच रत्नागिरी पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रदान करण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रात हवालदार मुरुडकर यांच्या उत्कृष्ट आणि कर्तव्यदक्ष सेवाभावाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. तसेच “भविष्यातही आपल्या हातून अशीच उत्कृष्ट कामगिरी घडो आणि पोलीस दलाचे नाव उज्ज्वल होत राहो,” असा विश्वास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी व्यक्त केला.
​सागर मुरुडकर यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह संपूर्ण देवरुख व रत्नागिरी पोलीस दलातून आणि नागरिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.