घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातून २० वर्षीय तरुणी बेपत्ता

आईची अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार

कणकवली : घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातील २० वर्षीय तरुणी घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. २७ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही तरुणी घरातून बेपत्ता झाली. नातेवाईक व ग्रामस्थांनी परिसरात शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे ३० सप्टेंबर रोजी तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत फिर्याद नोंदवली आहे.

काही दिवसांपूर्वी संबंधित तरुणीच्या मोठ्या बहिणीचे आजारपणामुळे निधन झाले होते. तिच्या बाराव्या दिवसाचा धार्मिक विधी २८ सप्टेंबर रोजी मूळ गावी करण्यात आला होता. त्यासाठी हे कुटुंबीय रत्नागिरी येथील वास्तव्यावरून मूळ गावी आले होते.

२६ सप्टेंबर रोजी रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबातील सर्वजण सुमारे रात्री १० वाजता घरात झोपले होते. २७ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास तरुणी बाथरूमला जाण्यासाठी उठली. तिच्या उठण्याच्या आवाजाने तिच्या आईलाही जाग आली. बाथरूमवरून परतल्यानंतर मुलगी पुन्हा झोपली. त्यानंतर पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान आई व वडील उठले असता मुलगी तिच्या अंथरुणावर दिसून आली नाही. घराची पाहणी केली असता मागील दरवाजा उघडा असल्याचे आढळून आले. त्यानंतर नातेवाईक व वाडीतील नागरिकांच्या मदतीने परिसरातील गावामध्ये मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र ती सापडून आली नाही. तिच्याकडील मोबाईल फोनही बंद येत आहे.

मुलगी घरी परत येईल, अशी प्रतीक्षा केल्यानंतर अखेर ३० सप्टेंबर रोजी आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीला कोणीतरी फूस लावून पहाटेच्या सुमारास अज्ञात ठिकाणी पळवून नेले असावे, असा संशय आईने तक्रारीत व्यक्त केला आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बेपत्ता तरुणीचे वय २० वर्षे असून तिची उंची सुमारे ४ फूट १० इंच, रंग गोरा आणि बांधा सडपातळ आहे. तिचे केस काळे, साधारण कुरळे व आखूड आहेत. तिच्या गळ्यात चांदीची चैन, हातात चांदीचे ब्रेसलेट व पायात चांदीची पैंजण आहे. ती फिकट वांगी रंगाचा हाफ हाताचा टी-शर्ट व काळ्या रंगाची फुल ट्रॅक पॅन्ट परिधान करून होती. तिच्याकडे स्काय ब्ल्यू रंगाचा रेडमी १३ मोबाईल होता. पोलिसांकडून बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यात येत असून, तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.