सहायक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम ३७ वर्षांच्या सेवेनंतर झाल्या निवृत्त

मुंबई पोलीस आयुक्तांच्या हस्ते झाला सत्कार

मुंबई:
मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि अष्टपैलू अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त (वाकोला विभाग) श्रीमती ज्योत्स्ना विलास रासम या ३० सप्टेंबर रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३७ वर्षे आणि ४ महिन्यांच्या निष्कलंक सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या या प्रदीर्घ सेवापूर्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

१५ जून १९८९ रोजी नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून (PTC) पोलीस उपनिरीक्षक म्हणून ज्योत्स्ना रासम यांच्या पोलीस दलातील प्रवासाची सुरुवात झाली होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विमानतळ सुरक्षा, एल. टी. मार्ग, वांद्रे, इमिग्रेशन, गुन्हे शाखा (क्राईम ब्रांच), केंद्रीय गुप्तचर विभाग (CBI), राज्य गुप्तवार्ता विभाग, वनराई पोलीस ठाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), हडपसर विभाग पुणे (DySP/ACP), एटीएस, डी. एन. नगर, पायधुणी, राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा (रायगड) आणि वाकोला विभाग अशा विविध आणि महत्त्वाच्या ठिकाणी जबाबदारी सांभाळली.

ज्योत्स्ना रासम यांची खरी कारकीर्द क्राईम ब्रांचमध्ये तब्बल १४ वर्षे बहरली. मरीन ड्राईव्ह रेप केस, सहार रेप केस आणि इगतपुरी येथील गाजलेले लैला खान हत्याकांड यांसारख्या अत्यंत क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावून त्यांनी आरोपींना न्यायालयात शिक्षा मिळवून दिली. सीबीआयमध्ये कार्यरत असताना त्यांनी तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा आणि यूटीआय घोटाळ्याचा तपास केला. तसेच, मुंब्रा येथून एका युएई महिला आरोपीस अटक करून दुबई सरकारच्या स्वाधीन केले; या कामगिरीचा उल्लेख तत्कालीन सीबीआय संचालक नीरज कुमार यांच्या ‘D for Don’ या पुस्तकातही करण्यात आला आहे. याशिवाय हाँगकाँग येथून एका आरोपीचे प्रत्यार्पण (Extradition) घडवून आणण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वर्दीतील शिस्तप्रिय अधिकाऱ्यासोबतच त्या एक उत्कृष्ट गिर्यारोहक आहेत. हिमालयीन पर्वतरांगांतील ‘हनुमान टिबा’ शिखर पादाक्रांत करणाऱ्या त्या मुंबई पोलीस दलातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. याशिवाय, स्त्री भ्रूणहत्येविरोधात जनजागृती करण्यासाठी त्यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असलेला ६,८५० किलोमीटरचा स्वर्णिम चतुर्भुज महामार्ग प्रवास अवघ्या ११ दिवसांत पूर्ण केला होता. कडक शिस्त, अचूक तपासपद्धती आणि उत्तम कुटुंबवत्सलता जपणाऱ्या श्रीमती ज्योत्स्ना रासम यांच्या सेवानिवृत्तीवर सहकाऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

निरोप समारंभात सत्कार करण्यात आला..