देवगड – प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील तळवडे येथील दीपक परब (४०) याचा मृतदेह बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चांदोशी येथील एका चिरेबंदी पत्राशेडमध्ये आढळून आला. त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबत देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे बौद्धवाडी येथील सतीश रमेश जाधव (३८) यांची चांदोशी येथील शेतजमिन आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांनी तेथील आपल्या जमिनीनजीकच्या चिरेबंदी पत्राशेडमध्ये एक तरुण निपचित पडलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. त्यांनी घटनेची माहिती तेथील पोलीस पाटील यांना दिली. सदरची माहिती देवगड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात त्या तरुणाला पोलीस पाटील व सतीश जाधव यांच्या मदतीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, सदर तरुणाची ओळख पटविण्यासाठी सोशल मीडियाद्वारे राबविण्यात आलेल्या मोहिमेत सदर मृत तरुणाचे नाव दीपक परब असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. या घटनेची फिर्याद सतीश जाधव यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.











