शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक, माजी सरपंच गोपाळ गवस यांचे निधन

​बांबोळी-गोवा येथे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास; मोर्ले गावासह दोडामार्ग तालुक्यावर शोककळा

​दोडामार्ग (प्रतिनिधी) :
मोर्ले गावचे माजी सरपंच तथा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे तालुका संघटक गोपाळ सुरेश गवस (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. बांबोळी (गोवा) येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकस्मात जाण्याने मोर्ले गावासह संपूर्ण दोडामार्ग तालुका, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

​गोपाळ गवस यांच्यावर गेल्या महिनाभरापासून वैद्यकीय उपचार सुरू होते. सुरुवातीला मणिपाल रुग्णालय (गोवा) आणि त्यानंतर बांबोळी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
​आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी मोर्ले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोककल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. ग्रामीण भागातील नागरी समस्या सोडवण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. शिवसेना पक्षाचे तालुका संघटक म्हणून काम करताना संघटना वाढीसाठी व तळागाळातील सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सदैव अग्रभागी असायचे. एक अभ्यासू, आक्रमक परंतु तितकेच प्रेमळ व मनमिळाऊ नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण तालुक्यात खास ओळख होती.

​त्यांच्या निधनाने गवस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तालुक्याने एक कर्तव्यदक्ष नेता आणि अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहिणी, पत्नी आणि शिक्षण घेत असलेल्या दोन मुली असा परिवार आहे.