परप्रांतीयांना जागा दिल्यास भाजप युवा मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा
स्थलांतराच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांच्या मोजक्या कार्यकर्त्यांना जागा वाटप होत असल्याचा आरोप
कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखाली भाजी, फुले व फळ विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत परप्रांतीय विक्रेत्यांना जागा न देता स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य द्यावे. स्थानिकांना डावलून परप्रांतीय विक्रेत्यांना जागा दिल्यास भाजप युवा मोर्चाच्या वतीने सत्ताधारी व प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे कणकवली शहराध्यक्ष सागर राणे यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायतीतर्फे शहरातील उड्डाणपुलाखालील जागेत भाजी व फळ विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याच्या गंभीर तक्रारी भाजप युवा मोर्चाकडे प्राप्त झाल्या आहेत. नवीन जागेत स्थानिक मराठी भूमीपुत्रांनाच प्राधान्य दिले गेले पाहिजे. परप्रांतीयांना जागा देण्यास भाजप युवा मोर्चाचा सक्त विरोध आहे.
स्थानिकांच्या हक्काच्या रोजगारावर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्यास भाजप युवा मोर्चा तो खपवून घेणार नाही. या प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. विक्रेत्यांच्या स्थलांतराच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांच्या मोजक्या कार्यकर्त्यांना जागा वाटप केले जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. हा स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय असून, एकाच व्यक्तीला बहुसंख्य जागा देण्याची चुकीची पद्धत तत्काळ थांबवावी. प्रत्येक स्थानिक विक्रेत्याला एकच जागा, या न्यायाने जागांचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरपंचायत प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून पारदर्शक पद्धतीने आणि स्थानिकांच्या हिताचा विचार करूनच जागांचे वाटप करावे. स्थानिक भूमीपुत्रांना डावलून परप्रांतीयांना किंवा सत्ताधारी कार्यकर्त्यांचे उदरभरण करण्याचा प्रयत्न झाल्यास भाजप युवा मोर्चाच्या वतीने नगरपंचायतीविरोधात ‘स्थानिक हक्क आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या विषयात लक्ष घालून स्थानिक भूमीपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी नगरसेवक स्वप्निल राणे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, चिटणीस गणेश तळगावकर, ऋतिक नलावडे, शहर उपाध्यक्ष मंदार सोगम, सरचिटणीस मुन्ना परब आदी उपस्थित होते.












