सावंतवाडीत बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारूवर पोलीस छापा

सबनीसवाडा येथून ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी:

सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा, जिमखाना मैदानासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीच्या राहत्या घराच्या पडवीत बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेली गोवा बनावटीची दारू सावंतवाडी पोलिसांनी छापेमारी करून जप्त केली आहे. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.५५ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५( ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी सबनीसवाडा येथील जिमखाना मैदानासमोर राहणारे संशयित आरोपी सीसील जॉन फेराव (वय ५७) यांनी आपल्या ताब्यात कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीर दारू बाळगल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण ८,५८० रुपये किमतीचा विविध दारूचा साठा हस्तगत केला.

जप्त केलेल्या मुद्देमालात २,२०० रुपये किमतीचे किंगफिशर प्रीमियम बिअरचे ११ टिन, १,४४० रुपये किमतीच्या मॅकडोवेल्स नंबर १ व्हिस्कीच्या ४ बाटल्या, १,१४० रुपये किमतीच्या रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या ३ बाटल्या, ६०० रुपये किमतीच्या बुलेट ७७७ ओल्ड काजू फेणीच्या ६ बाटल्या, १,२०० रुपये किमतीच्या कमांडर एक्सएक्सएक्सच्या १० बाटल्या, १,८२० रुपये किमतीच्या ओल्ड मंकच्या ७ बाटल्या आणि १,२८० रुपये किमतीच्या ब्लॅक डिलक्स व्हिस्कीच्या ४ बाटल्यांचा समावेश आहे. हा सर्व दारूचा साठा गोवा बनावटीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कारवाईची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे पोलीस हवालदार धोत्रे आणि महिला पोलीस शिपाई ठाकूर यांनी सायंकाळी ७.५५ ते रात्री १०.३० या वेळेत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर गुन्ह्याची नोंद १ ऑक्टोबर रोजी रात्री ११.०७ वाजता सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अंमलदार नाईक यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.