भाजपा पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर!दुष्काळ स्थितीत सरकार शेतकरी व जनतेच्या पाठीशी

खासदार नारायण राणे जनतेप्रती संवेदनशील नेतृत्व

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्याचेही केले विशेष कौतुक

भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची पत्रकार परिषद

मालवण | प्रतिनिधी : १९७२ नंतरचा सर्वात भीषण दुष्काळ स्थिती जाणवत आहे. शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. या बिकट परिस्थितीत सरकार बळीराजा सोबत आहे. यां सोबतच भाजपचे सर्व वरिष्ठ नेते आणि प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहाणी करत आहेत. सोबत असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना देत आहेत. तसेच कच्चे बंधारे उभारणी मोहीम व्यापक स्वरूपात सुरु आहे. असे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

भाजप मालवण तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत धोंडी चिंदरकर बोलत होते. यावेळी भाजपा महिला प्रदेशउपाध्यक्ष रश्मी लुडबे, प्रभारी शहराध्यक्ष पंकज सादये, महेश मांजरेकर, नगरसेवक ललित चव्हाण, अंशून गावडे, शिल्पा खोत, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी, अमृता फाटक, संतोषी कांदळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

चिंदरकर म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या सूचनांनुसार आम्ही गेल्या दोन दिवसांपासून विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी करत आहोत. अनेक ठिकाणी शेती करपून गेली आहे. काही ठिकाणी शेतीची वाढ झालीच नाही. काही ठिकाणी शेती हिरवी दिसत असली तरी प्रत्यक्षात पीक नाहीच अशी स्थिती आहे. पंचनामे सुरु असून अधिकारी वर्ग चांगले काम करत आहे, मात्र कुठेही कामचुकार पणा दिसल्यास सहन केला जाणार नाही. असेही चिंदरकर यांनी सांगितले.

विरोधकांवर टीका

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, “माजी आमदार वैभव नाईक यांनी सध्याच्या गंभीर परिस्थितीत राजकारण थांबवून पालकमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत.” असा टोला त्यांनी वैभव नाईक यांना लागावला. तसेच सर्वांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक बंधारे उभरावेत असेही आवाहन चिंदरकर यांनी केले.

कच्चे बंधारे उभारणी

खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनात भाजपा पदाधिकारी प्रशासनास सहकार्य करत ठिकठिकाणी पाणी अडवण्यासाठी कच्चे बंधारे बांधत आहेत. या कामात भाजपचे सर्व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक पूर्ण ताकदीने उतरतील आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही चिंदरकर यांनी दिली. सर्वांनी पाणी साठवण्याच्या चळवळीत सहकार्य करावे, असे आवाहनही चिंदरकर यांनी केले.

पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष कौतुक

राज्यात 265 तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सह सर्व आठही तालुक्यांमध्ये दुष्काळाची ‘प्रथम कळ’ अर्थात Trigger-1 लागू करण्यात आले. शेतकरी संकटात असताना त्यांच्या पाठीशी राहून त्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी तत्पर असणारे आपले पालकमंत्री नितेश राणे सातत्याने प्रयत्नाशील आहेत. जिल्ह्यात पाणी पातळी वाढण्यासाठी आतापासून नियोजन सुरु आहे. अनेक ठिकाणी बंधारे उभारणी काम सुरु आहे. शासनाच्या दुष्काळ निवारण उपसमितीत पालकमंत्री नितेश राणे यांचा सहभाग आहे. शेतकरी आणि जनातेच्या हितासाठी तत्पर पालकमंत्री नितेश राणे यांचे धोंडी चिंदरकर यांनी विशेष कौतुक केले आहे.

राणे साहेब संवेदनशील नेतृत्व

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे नेहमीच जनतेच्या हिताच्या दृष्टीने पुढाकार घेऊन काम करतं असतात. संकट काळात त्यांचा मदतीचा हात सदैव असतो. आताही दुष्काळ स्थितीत पुढील भीषण पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी फाउंडेशन व अन्य प्रशासकीय स्तरावर बैठाका घेऊन व्यापक नियोजन सुरु आहे. राणे साहेब खऱ्या अर्थाने जन हिताच्या दृष्टीने संवेदनशील नेतृत्व आहेत. असे धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.