वैभववाडी येथे सेवा संकल्प दौड मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सभापती सिद्धेश रावराणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी प्रतिनिधी :
सेवा संकल्प अभियान अंतर्गत वैभववाडी येथे सेवा संकल्प दौड ला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
देशाचे मननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात “सेवा परमोधर्म ” या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे. त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सेवा संकल्प अभियान महाराष्ट्र शासन राबवत आहे. त्या अनुषंगाने वैभववाडी पंचायत समितीच्या वतीने हे सेवा संकल्प अभियान 17 सप्टेंबर पासून राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज “सेवा संकल्प दौड ” आयोजित केली होती. या दौड कार्यक्रमांमध्ये वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, नगराध्यक्षा श्रेया रावराणे, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, सुधीर नकाशे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, गटशिक्षणाधिकारी थोरात आदी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौंडला तहसीलदार पाटील साहेब यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध शासकीय कार्यालयातील शासकीय अधिकारी कर्मचारी, तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभववाडी बाजारपेठेतील छत्रपती संभाजी महाराज चौक ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्ट हाऊस व परत अशाप्रकारे या दौडचे आयोजन केलेले होते. या दौडमध्ये सर्वांनी सहभागी झाल्याबद्दल आणि ही दौड यशस्वी केल्याबद्दल सभापती सिद्धेश रावराणे यांनी सर्व सहभागी अधिकारी पदाधिकारी यांचे आभार मानले.