सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून भाजपचा पुढाकार
मालवण | प्रतिनिधी : संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन आगामी काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी नांदोस व अन्य ठिकाणी जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे करण्यात येत आहेत. सेवा संकल्प अभियान तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदोस येथील टेंबवाडी तसेच चव्हाणवाडी पश्चिम परिसरात पाणी अडवण्यासाठी माती बंधारे बांधण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येत आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी वाहून न जाता ते स्थानिक पातळीवर अडवून त्याचा साठा वाढविणे, भूजल पातळी टिकविणे तसेच शेती व ग्रामस्थांना भविष्यातील पाणीटंचाईपासून दिलासा देणे, या उद्देशाने माती बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक पातळीवर लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या अशा जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे उपलब्ध पाणी अधिक काळ टिकून राहण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमावेळी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, महिला तालुकाध्यक्ष समृद्धी आसोलकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, तालुका सरचिटणीस विजय निकम, युवामोर्चा मालवण मंडळ अध्यक्ष सुमित सावंत, बंडू गावडे, सुशील गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.













