‘श्वास’ने मारली बाजी; देवगडच्या शेठ म. ग. हायस्कूलला प्रथम क्रमांक

कणकवली एस. एम. हायस्कूल द्वितीय तर कुडाळ हायस्कूल तृतीय..

वेंगुर्ले येथे जिल्हास्तरीय “विज्ञान नाट्योत्सव २०२६” उत्साहात संपन्न..

वेंगुर्ले : दाजी नाईक
शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय ‘विज्ञान नाट्योत्सव २०२६’ विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहात संपन्न झाला. देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलने सादर केलेल्या ‘श्वास’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात बाजी मारली. त्यामुळे या हायस्कूलची विभागस्तरीय नाट्योत्सवासाठी निवड झाली आहे.

वेंगुर्ला कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या नाट्योत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या नाट्योत्सव स्पर्धेच्या निकालामध्ये प्रथम क्रमांक शेठ म. ग. हायस्कूल, देवगड यांच्या ‘श्वास’ या नाटिकेने पटकाविला. या संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तर उत्कृष्ट स्त्री अभिनय कु. अनन्या जोशी -शेठ म. ग. हायस्कूल, देवगड, द्वितीय क्रमांक एस. एम. हायस्कूल, कणकवली – ‘स्मार्ट व्हर्जन’ यामध्ये उत्कृष्ट पुरुष अभिनय कु. सोहम ताटे एस. एम. हायस्कूल, कणकवली, उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम क्रमांक – एस. एम. हायस्कूल, कणकवली आणि तृतीय क्रमांक कुडाळ हायस्कूल, कुडाळ -‘मिशन तारांगण’ यांनी मिळविला. याशिवाय उत्कृष्ट लेखनाचा प्रथम क्रमांक देण्यात आला. जिल्ह्यातून सहभागी झालेल्या सातही तालुक्यातील सहभागी सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या नाट्योत्सवातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार : प्रमोद कामत
बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले, की “विज्ञान हा केवळ पाठ्यपुस्तकातील विषय न राहता विद्यार्थ्यांच्या विचारसरणीचा आणि दैनंदिन जीवनाचा भाग झाला पाहिजे. विज्ञान नाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या देवगडच्या शेठ म. ग. हायस्कूलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करतो.” असेही त्यांनी सांगितले.

या नाट्योत्सवासाठी परीक्षक म्हणून डॉ. रविंद्र ठाकूर (एस. आर. एम. कॉलेज, कुडाळ), प्रा. शेखर गवस (कणकवली) आणि अमर प्रभू (यशवंतराव भोसले पॉलीटेक्निक, सावंतवाडी) यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, शिक्षणाधिकारी श्री. संदेश किंजवडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, नगरसेवक रिया केरकर, पंचायत समिती सदस्य आपा फणसेकर, तसेच तुषार साळगावकर, कमलेश गावडे यांच्यासह विस्तार अधिकारी श्रीमती आवटी, विज्ञान मंडळ सचिव सत्यपाल लाडगांवकर, सहसचिव संजय शेवाळे, कोषाध्यक्ष राजाराम फर्जंद, संघटक सतीशकुमार कर्ले यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे अध्यक्ष यामध्ये श्री. आनंदा बामणीकर, श्री. ऋषिकेश गावडे, श्री. मिलिंद गावकर, श्री. चंद्रकांत चव्हाण, श्री. तानाजी चव्हाण, श्री. स्वप्नील पाटील, श्रीमती प्रिती सावंत, श्रीमती तृप्ती देसाई, श्रीमती सविता जाधव, श्रीमती समुद्रे, श्रीमती प्रणिता बांबूळकर तसेच श्री. सुशांत धुरी, मुख्याध्यापक, पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी केले. सूत्रसंचालन जाधव मॅडम यांनी केले, तर आभार गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे यांनी मानले.