विभा अरविंद ग्रंथालयात साहित्यिक कार्यक्रम; कवी अभिजीत पिसे यांचा विशेष सहभाग
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील खेंड, चिपळूण येथील विभा अरविंद ग्रंथालयात महात्मा गांधी जयंती, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती तसेच मराठी अभिजात भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ कवी अभिजीत पिसे यांच्या निवडक कवितांचे वाचन तसेच मान्यवरांची मनोगते यामुळे कार्यक्रमाला साहित्यिक रंगत आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पूज्य गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस, ज्येष्ठ कवी अभिजीत पिसे, ग्रंथालयाचे अध्यक्ष बापूसाहेब काणे आणि संचालक मंडळाच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. विनायक होमकळस यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. अहिंसेच्या तत्त्वाचा जगभर स्वीकार झाला असून, हातात शस्त्र न घेता लढाई जिंकणारा योद्धा म्हणून गांधीजींच्या कार्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. गांधीजींच्या विचारांचा आपल्या जीवनावर झालेला प्रभावही त्यांनी मांडला.
ग्रंथालयाचे अध्यक्ष बापूसाहेब काणे यांनी प्रास्ताविकातून ग्रंथालयाच्या वाटचालीची माहिती दिली. गेल्या चार महिन्यांपासून खेंड परिसरात पुस्तक चळवळीला चालना देण्याचे काम सुरू असून, वाचकांसाठी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पुस्तकप्रेमींकडूनही ग्रंथालयाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेकांनी पुस्तकांचे संच भेट दिले आहेत. त्यामुळे ग्रंथालयात सुमारे सात हजार पुस्तकांचा समृद्ध संग्रह उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले. वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ कवी श्री.अरुण इंगवले यांनी गांधीजींबद्दल तरुणपणी असलेले आपले मत आणि गांधीजींच्या जीवनकार्याचे वाचन केल्यानंतर त्यात झालेला बदल याबाबत मनोगत व्यक्त केले. मराठी अभिजात भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून खेंड येथील ज्येष्ठ कवी अभिजीत पिसे यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांच्या कविता दैनिक ‘सागर’मधून प्रसिद्ध होत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या निवडक कवितांचे वाचन करून उपस्थितांची दाद मिळविली.
नवकवी विजय कदम यांनीही कविता सादर केली. दीपक महाडिक यांनी कवी गुरू ठाकूर यांच्या कवितेचा रसास्वाद उपस्थितांना करून दिला. यावेळी डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबतही चर्चा झाली. आंबेडकर वाचनालय, चिपळूण यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या साहित्य संमेलनाला विभा अरविंद ग्रंथालयाने सहकार्य करावे, असे आवाहन सुनील खेडेकर यांनी केले. ग्रंथालय चळवळीतील मार्गदर्शिका सौ.गौरी भोसले यांनी व्यक्तिगत कारणामुळे संचालिका पदाचा राजीनामा दिल्यानंतर सौ.मुग्धा मोरे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यानिमित्त सौ.गौरी भोसले आणि सौ.मुग्धा मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास ग्रंथालयाचे कोषाध्यक्ष विनायक ओक, सौ.मेघा बेटकर, प्रा. विकास मेहेंदळे, प्रसाद रिसबूड, प्रकाश गांगण, सुहास चव्हाण यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. ग्रंथपाल कु.सुप्रिया खोत, सौ.पूर्वा कांबळे तसेच पूज्य गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस, दीपक महाडिक, अरुण हिंदाने, सई वरवटकर, सुनील खेडेकर, मंगेश वेस्वीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप ग्रंथालयाचे कार्यवाह विजय कदम यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.













