
रत्नागिरी : डान्स स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया आयोजित “इंडियाज डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६” ही भव्य राष्ट्रीय स्पर्धा दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे उत्साहात पार पडली. प्रथमच चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशातील २२ राज्यांमधून २६३ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेला रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, श्री. सचिन मांडवकर, सार्वजनिक बांधकाम सभापती श्री. कपिल शिर्के, क्रीडा व कला सभापती सौ. हर्षाली पवार, माजी नगरसेविका सौ. सीमाताई चाळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे चेअरमन श्री सुरज विलास जाधव, खजिनदार अभिषेक कुमार, अध्यक्ष कैलास कौशल, उपाध्यक्षा सपना यादव व अर्पण सिंग यांच्या उपस्थितीत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
चिपळूणमधील सुप्रसिद्ध DAIDAS DANCE STUDIO (डायडाज डान्स स्टुडिओ) येथील विद्यार्थ्यांनी २०१४ ते २०२६ या कालावधीत सलग अकरा वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावत अभिमानास्पद इतिहास रचला आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत संपूर्ण महाराष्ट्रासाठी चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली.
स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी
हिपहॉप सोलो (१० वर्षाखालील) – कु. अधिरा अभिजीत लाड – सुवर्णपदक
हिपहॉप सोलो (१४ वर्षाखालील) – कु. काव्या दीपक चव्हाण – सुवर्णपदक
फ्री स्टाईल सोलो (१० वर्षाखालील) – कु. गार्गी राजेश सुपे – कांस्यपदक
ड्युएट फ्री स्टाईल (१२ वर्षाखालील) – प्रीत प्रतीक मसुरकर व चेतना दुष्यंत खेडेकर – रौप्यपदक
फ्री स्टाईल सोलो (१४ वर्षाखालील) – स्वरांजली निमकर व रिया शिंदे – रौप्यपदक
ग्रुप हिपहॉप (१४ वर्षाखालील) – अधीर अभिजीत लाड, पूर्वा वृषांत जाधव, भक्ती वृषांत जाधव, काव्या दीपक चव्हाण, आराध्य दीपक चव्हाण – रौप्यपदक
फ्री स्टाईल सोलो (१० वर्षाखालील) – पूर्वा वृषांत जाधव – रौप्यपदक
स्पर्धेनंतर प्रमुख मान्यवरांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. दिनांक २४ मे रोजी नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली असून सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
गेल्या दोन महिन्यांपासून कठोर सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण व पालकांचे भक्कम सहकार्य यामुळे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण परिश्रम व उच्च दर्जाचे प्रशिक्षण यामुळे डायडाज डान्स स्टुडिओ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत आहे.












