१५ ऑक्टोबरपर्यंत सीलबंद निविदा सादर करण्याचे आवाहन
देवरूख (प्रतिनिधी)
भारताच्या राष्ट्रपतींच्यावतीने पोस्ट खात्याच्या वापरासाठी देवरूख पोस्ट ऑफिसकरिता भाडेतत्त्वावर तयार इमारत मिळविण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या डाकघर अधीक्षक यांच्यामार्फत सीलबंद निविदा मागविण्यात येत आहेत.
इच्छुक इमारत मालकांनी लेखी अर्जासह इमारतीचा ढोबळ नकाशा, क्षेत्रफळ (चौरस फुटात), अपेक्षित भाडे, इमारतीचा असेसमेंट उतारा व इमारत उपलब्ध होणाऱ्या तारखेच्या उल्लेखासह सीलबंद निविदा सादर कराव्यात. निविदा लिफाफ्यावर “देवरुख पोस्ट ऑफिस करिता इमारत भाडे तत्त्वावर देणेबाबत” असा स्पष्ट उल्लेख करून तो ‘अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग, रत्नागिरी-४१५६१२’ या पत्त्यावर दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
इमारत ग्राहकांच्या सोयीच्या, दळणवळणाच्या मध्यवर्ती ठिकाणी व तळमजल्यावर असावी.उघडा व्हरांडा व मोकळी जागा वगळून इमारतीचे चटई क्षेत्रफळ (कार्पेट एरिया) किमान १ हजार ५०० चौरस फूट असावे. इमारतीमध्ये मुबलक पाणीपुरवठा स्वतंत्र वीज मीटर, दिवे, आवश्यक त्या ठिकाणी पंखे, वॉश बेसिन, जनरेटरसाठी ३-फेज कनेक्शन आणि स्वतंत्र शेड असणे आवश्यक आहे. टपाल कर्मचाऱ्यांसाठी इमारतीमध्ये किंवा इमारतीला लागून नळ-पाणी सुविधेसह वैयक्तिक शौचालय असणे बंधनकारक आहे. निविदा मंजूर झाल्यास संबंधित निविदाधारकाला स्वखर्चाने डाक विभागाच्या नियमांनुसार ५ वर्षांचा भाडेकरार नोंदणीकृत (रजिस्टर्ड) करून द्यावा लागेल.
इमारत कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये असल्यास नियमानुसार जीएसटी (GST) लागू राहील.प्राप्त झालेल्या सीलबंद निविदा दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता अधीक्षक डाकघर यांच्या समक्ष, उपस्थित राहू इच्छिणाऱ्या निविदाकारांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. प्राप्त निविदांपैकी कोणतीही एक अथवा सर्वच निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार अधीक्षक डाकघर, रत्नागिरी यांनी राखून ठेवला असून, त्यांचा निर्णय सर्व संबंधितांवर बंधनकारक राहील, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.













