दोन दुभत्या गाईंचा आगीत होरपळून मृत्यू; १ लाख ६० हजारांचे नुकसान
मंडणगड, प्रतिनिधी :
मंडणगड तालुक्यातील मौजे दहागाव निमदेवाडी येथे मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागून गोठा जळून खाक झाला. या दुर्घटनेत दोन दुभत्या गाईंचा आगीत होरपळून मृत्यू झाला असून, गोठ्यासह पशुधनाचे मिळून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आली आहे.
महेंद्र रामचंद्र चव्हाण व नीलेश रामचंद्र देवरुखकर यांच्या गुरांच्या गोठ्याला ही आग लागली. गोठ्यामध्ये एकूण दोन गाई व दोन वासरे बांधलेली होती. आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे दोन वासरे व एका गाईला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दोन दुभत्या गाईंना वाचविता आले नाही. या आगीत गोठ्यालगत असलेली लाकडाची खोपीदेखील जळून नुकसान झाले.
ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच मंडणगडचे महसूल मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, ग्राम महसूल अधिकारी उद्धव घाटूश, सरपंच मंगेश दळवी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच बहुसंख्य ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाने घटनास्थळी नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला.
पंचनाम्यानुसार गोठ्याच्या नुकसानीचे अंदाजे ८० हजार रुपये, तर दोन गाई मयत झाल्याने अंदाजे ८० हजार रुपये, असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संबंधित पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













