सावंतवाडीत नगरपालिकेची धडक कारवाई; रस्ता अडवणारे अनधिकृत गाडे हटवले
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या लावण्यात आलेल्या अनधिकृत गाडे आणि टपऱ्यांवर नगरपालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही दखल न घेतलेल्या गाडेधारकांवर प्रशासनाने थेट कारवाईचा हातोडा चालवला. गणेशोत्सव काळापासून सुरू करण्यात आलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेचा हा दुसरा टप्पा असून, याद्वारे शहरात रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व बेकायदेशीर टपऱ्या हटवण्यात येत असल्याची माहिती नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिली.
बुधवारी दुपारच्या सुमारास नगरपालिकेच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. यामध्ये प्रामुख्याने एसपीके कॉलेजसमोरील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे मांडण्यात आलेले गाडे आणि टपऱ्या पूर्णपणे हटवण्यात आल्या. या मोहिमेत नगरपालिकेच्या विविध विभागांचे तब्बल १२ ते १३ अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत होते. नगरपालिकेच्या स्वतःच्या मालमत्तेच्या हद्दीतील तसेच शहरात सार्वजनिक वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्यांवर प्राधान्याने ही कारवाई केंद्रित करण्यात आली होती.
मोहिमेबाबत अधिक माहिती देताना प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले की, शहरात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनेक ठिकाणी बेकायदेशीर गाडे आणि टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. ही अतिक्रमण हटाव मोहीम गणपती उत्सवाच्या काळापासून टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. संबंधित अतिक्रमणधारकांना आपले गाडे स्वतःहून काढून घेण्यासाठी सुरुवातीला दोन ते तीन वेळा स्पष्ट सूचना व पूर्वकल्पना देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाच्या सूचनांकडे संबंधितांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे अखेर नगरपालिकेला स्वतः पटांगणात उतरून ही प्रत्यक्ष कारवाई करावी लागली आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत गाड्यांबाबतही संबंधित विभागाला रीतसर कळवण्यात आले असून, लवकरच त्या विभागाकडूनही योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रामेश्वर प्लाझा परिसरातील कारवाई बारगळल्याचा आरोप करत पालिका प्रशासन पक्षपातीपणे वागत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. या चर्चेबाबत विचारणा केली असता मुख्याधिकारी औंधकर यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. रामेश्वर प्लाझा येथील अनधिकृत बांधकामांना अद्याप नोटीस जारी करण्यात आलेल्या नाहीत, कारण ते गाडे पार्किंगच्या जागेत आहेत. ती खासगी जागा असून तेथे पोटभाडेकरू ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन संबंधितांना जागेवरच सूचना दिल्या आहेत. लवकरच त्या क्षेत्रात पार्किंगचे अधिकृत फलक लावले जाणार असून, त्यानंतर पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर पुढील टप्प्यात नक्कीच कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच ज्या अधिकृत दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर रस्त्यावर अतिरिक्त अतिक्रमण केले आहे, त्यांना नगरपालिकेकडून नोटिसा बजावण्यात येत असून त्यांनी स्वतःहून अतिक्रमण न हटवल्यास त्यांच्यावरही निश्चितपणे कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.













