मृदा परीक्षणातून समृद्ध शेतीचा मार्ग; आवळेगावात कृषिकन्यांचे प्रात्यक्षिक

कुडाळ :
छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सध्या आवळेगाव येथे कार्यरत असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मृदा नमुना संकलन व मृदा परीक्षणाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक आयोजित केले.

कृषिकन्या विशाखा सूर्याजी, सायली धुरी, सृष्टी बोले, किर्ती गुरव व दुर्गा मोडक यांनी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने मातीचा नमुना कसा घ्यावा, नमुना संकलन करताना कोणती काळजी घ्यावी तसेच मृदा परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रत्यक्ष शेतात मातीचा नमुना घेण्याची पद्धत दाखवून देण्यात आली.

मृदा परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता समजून घेता येते. त्याआधारे योग्य खत व्यवस्थापन करून उत्पादन खर्च कमी करण्यास तसेच पीक उत्पादन वाढविण्यास मदत होते, असे कृषिकन्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास आवळेगावच्या सरपंच सौ. पूर्वा सावंत, पोलीस पाटील राजेश जानकर, शेतमालक अजित सावंत तसेच गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांनी कृषिकन्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध कृषीविषयक शंकांचे निरसन करून घेतले. कृषिकन्यांच्या या पहिल्याच प्रात्यक्षिकामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये मृदा आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून पुढील काळात विविध कृषीविषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.