श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरूखचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण

देवरूख (प्रतिनिधी):

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलची सुरुवात दोन वर्ग खोल्यांपासून झाली आणि २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीपर्यंत प्रवास प्रेरणादायी आहे. प्रशालेला २१ जून, २००२ रोजी पहिली मान्यता मिळाली होती. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे शाळेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, त्यानिमित्त शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर, २०२६ रोजी रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज सुमारे ५७० विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या शाळेची सुरुवात मात्र केवळ दोन वर्गखोल्या आणि ३० विद्यार्थ्यांपासून झाली होती.

बदलत्या काळाची गरज ओळखून देवरुख परिसरात इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दूरदृष्टीतून या शाळेची संकल्पना साकारली ती विद्यमान संस्थाध्यक्ष श्री. सदानंद भागवत यांनी. अमेरिकेतून देवरुख येथे परत आल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, या गरजेची जाणीव त्यांना झाली. त्यांनी तत्कालीन संस्थाध्यक्षांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्वीकारून आवश्यक निधी उभारण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या उभारणीसाठी श्री. भागवत यांनी वैयक्तिक त्यागही केला. त्यांच्या आत्यांनी त्यांच्यासाठी ठेवलेली रक्कम त्यांनी शाळेच्या उभारणीसाठी दिली. या कार्यात ॲड. रमेश केतकर यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. शाळेचे बांधकाम स्वतःच्या देखरेखीखाली व प्रत्यक्ष सहभागातून केल्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली.

२१ जून, २००२ रोजी शाळेला पहिली मान्यता मिळाली. सुरुवातीला स्वतःची इमारत नसल्याने संस्थेच्या जुन्या इमारतीतील, पूर्वी महाविद्यालयाचे कॅन्टीन असलेल्या जागेतील दोन वर्गखोल्यांमध्ये शाळेचे कामकाज सुरू झाले. विदुला पुरोहित आणि दीपाली मांगले या दोन शिक्षिका, तर ललिता गायकवाड यांनी मदतनीस म्हणून सुरुवातीची जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे हेही मोठे आव्हान होते. श्री. सदानंद भागवत आणि ॲड. रमेश केतकर यांनी घरोघरी भेटी देऊन पालकांशी संवाद साधला. विविध बालवाड्यांमध्ये पालकसभा घेऊन इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शाळेचा विस्तार होत गेला. सन २०१३-१४ पासून शाळेत ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्सची सुरुवात होऊन शाळेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय एकाच छताखाली सुरू झाली. यानंतर श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, देवरुखने स्वतःची नवी ओळख निर्माण केली.

आज शाळेत सुमारे ५७० विद्यार्थी शिक्षण घेत असून, शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, विविध प्रकारच्या स्पर्धा, क्रीडा, संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण, तसेच विज्ञान व गणित विषयांचा भक्कम पाया यावर शाळेत विशेष लक्ष दिले जाते. शाळेच्या २५ वर्षांच्या वाटचालीत अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील व परदेशातील नामवंत संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले आहे.. घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी, आयसीटी यांसारख्या नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिक्षण घेऊन आपली उत्तम कारकीर्द घडवली आहे.. घडवीत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील शाखांमध्ये, विविध शाखातील संशोधक, विविध प्रकारच्या व्यवस्थापन शाखांसह, कला व मनोरंजन प्रकारातील विविध क्षेत्रांतही माजी विद्यार्थी कार्यरत आहेत.

शाळेच्या यशस्वी २५ वर्षाच्या वाटचालीत संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आजी-माजी विद्यार्थी आणि देवरुख परिसरातील हितचिंतक यांचे योगदान आहे. विशेषतः श्री. सदानंद भागवत यांची दूरदृष्टी व त्याग आणि ॲड. रमेश केतकर यांची निस्वार्थी व उत्तम सहकार्य यामुळे या शाळेच्या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार मिळाला. शुक्रवार दि. ९ ऑक्टोबर, २०२६ माटे-भोजने सभागृहात रौप्यमहोत्सवी सोहळ्यास आयोजन स. १०:०० केले जाणार आहे. या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला मा. श्री. श्रीकृष्णजी चितळे, संचालक चितळे बंधू मिठाईवाले आणि मा. श्री. गिरीशजी चितळे, संचालक, चितळे डेअरी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. सदानंद भागवत, कार्यवाह श्री. शिरीष फाटक, शाळेच्या अध्यक्षा ॲड. सौ. वेदा प्रभुदेसाई, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, आजी-माजी विद्यार्थी आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. दोन वर्गखोल्या आणि ३० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शैक्षणिक वाटचाल आज शेकडो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा आधार बनली आहे. संघर्ष, त्याग, सहकार्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर उभी राहिलेली ही संस्था २५ वर्षे पूर्ण करत असताना पुढील काळातही “Igniting Minds through Quality Education” या ध्येयवाक्यानुसार ज्ञानाची ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित करण्याचा संकल्प कायम ठेवत आहे, याचा विशेष अभिमान वाटतो.