पोलीस तपासात उघड ; मारहाणीतून मृत्यू
सावंतवाडी :
सावंतवाडी रोड रेल्वेस्थानकानजीक असलेल्या निरवडे नमसवाडी येथे काल सायंकाळी रस्त्याच्या कडेला आढळून आलेल्या २३ वर्षीय युवकाचा घातपात झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. आजीम खान (रा. उत्तर प्रदेश) असे मृत युवकाचे नाव असून, त्याची गोव्यात हत्या करून मृतदेह या ठिकाणी टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
निरवडे नमसवाडी येथे मंगळवारी सायंकाळी रस्त्यालगत एका युवकाचा मृतदेह दिसून आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनाम्याअंती मृतदेह ताब्यात घेतला. मयताच्या खिशात आढळून आलेले ओळखपत्र आणि मोबाईलच्या आधारे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आजीम खान हा गोव्यात एका शावरमा सेंटरमध्ये काम करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मयत आजीम खान आणि त्याच्या मालकाचा मेहुणा हे दोघे मिळून स्वतंत्र शावरमा सेंटरचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत होते. मात्र, हा निर्णय शावरमा सेंटरच्या मालकाला आवडला नाही. याच रागातून मालकाने आजीमला बोलावून घेऊन विचारणा केली. या वेळी दोघांमध्ये तीव्र शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यातून मारहाण सुरू झाली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने आजीमचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर घाबरलेल्या शावरमा सेंटरच्या मालकाने हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चारचाकी गाडीतून मृतदेह निरवडे नमसवाडी येथे आणून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. परंतु, मयताच्या खिशात असलेल्या ओळखपत्रामुळे संपूर्ण प्रकारचा उलगडा झाला.
हा गुन्हा ओल्ड गोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलीस ठाण्यात प्रथम गुन्ह्याची नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी हा गुन्हा गोवा पोलिसांकडे वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी सावंतवाडी पोलिसांचे पथक सध्या गोव्यात दाखल झाले आहे. या घटनेबाबत अधिकृत माहिती मिळवण्यासाठी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.












