कृषी परिवार देवगडची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
देवगड : देवगड तालुक्यातील कृषी विक्रेत्यांची **‘कृषी परिवार देवगड’**ची वार्षिक सभा बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी देवगड येथील हॉटेल डायमंड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
आगामी कृषी हंगामाच्या पार्श्वभूमीवर बदलते हवामान, वातावरणातील अनिश्चितता तसेच अल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे कृषी क्षेत्रासमोर निर्माण होणारी आव्हाने यावर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कृषी विक्रेत्यांनी आवश्यक नियोजन, खबरदारी आणि व्यवसायातील योग्य उपाययोजना याबाबत उपस्थितांनी विचारविनिमय केला.
सभेत मागील वर्षापासून येणे असलेल्या उधारीच्या रकमेचा प्रश्न हा देखील महत्त्वाचा विषय ठरला. कृषी व्यवसायातील आर्थिक शिस्त मजबूत करण्यासाठी उधारीचे योग्य व्यवस्थापन आणि वेळेत वसुली करणे आवश्यक असल्याचे मत परिवाचे अध्यक्ष श्री विनायक जोईल यांनी व्यक्त केले.
SKP उधारी ॲपचा डेमो
सभेतील प्रमुख विषयांपैकी एक असलेल्या उधारी नियंत्रण योजनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी विक्रेत्यांमधील उधारीचे व्यवहार अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने SKP उधारी ॲपचा प्रात्यक्षिक (Demo) यावेळी सादर करण्यात आला.
ॲपचे डेव्हलपर व मार्गदर्शक श्री. महेश धुरी यांनी SKP ॲपची कार्यपद्धती, विविध सुविधा, उपयोग आणि कृषी विक्रेत्यांना उधारी व्यवस्थापनामध्ये होणारे फायदे याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
SKP ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी, व्यवहारांची नोंद, देय रकमेचे व्यवस्थापन, पेमेंट हिस्ट्री तसेच उधारीची माहिती अधिक व्यवस्थित पद्धतीने हाताळता येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उधारी कमी करण्याचा सामूहिक निर्णय
चर्चेनंतर कृषी व्यवसायातील उधारीचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करून भविष्यात उधारी नियंत्रणात आणण्याचा एकमुखी निर्णय सभेत घेण्यात आला.
या निर्णयामुळे कृषी विक्रेत्यांच्या व्यवसायात आर्थिक शिस्त, व्यवहारातील पारदर्शकता आणि परस्पर विश्वास वाढण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कृषी विक्रेत्यांची एकजूट आणि सामूहिक निर्णयातून ‘कृषी परिवार देवगड’ने कृषी व्यवसाय अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.













