देवगडच्या पाणीपुरवठ्यावर तडजोड नाही; नादुरुस्त पाईपलाईन तातडीने दुरुस्त करण्याचे पालकमंत्री ना. नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना कडक आदेश!

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी

“देवगडच्या पाण्यावर तडजोड नाही!;

नादुरुस्त झालेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करा!

पालकमंत्री नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना कडक इशारा”

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी

देवगड-विजयदुर्ग शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळ योजनेत कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांना पाण्यासाठी एकाही दिवसाची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून तातडीने कामे पूर्ण करावीत, असे कडक निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित आढावा बैठकीत देवगड-नांदगाव मार्गाच्या सुरू असलेल्या रस्ते कामामुळे तसेच महावितरणच्या विविध कामांमुळे अनेक ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे नुकसान झाल्याची बाब समोर आली. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री राणे यांनी ज्या ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त झाली आहे, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करून आवश्यकतेनुसार नव्याने पाईपलाईन टाकण्याचे आदेश दिले. आपण स्वतः या सर्व कामाची पाहणी करणार आहोत असेही निर्देश पालकमंत्र्यांनी सर्वा अधिकार्‍यांना दिले.
“पाण्यासाठी नागरिकांची कोणतीही तक्रार येता कामा नये. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे ही संबंधित विभागांची सामूहिक जबाबदारी आहे.” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरण कंपनीला प्राधान्यक्रमाने सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
विजयदुर्ग कडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याची कामे वेगाने सुरू असल्याने विकासकामांबरोबरच पाणीपुरवठा व्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, सतीश सावंत, स्थानिक लोकप्रतिनिधी संजय बोबडी, भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.