शैक्षणिक क्षेत्रातील नवोपक्रमशील कार्याची दखल
शिरगाव (प्रतिनिधी) : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी येथील उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव राजाराम जाधव यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे.गोविंदराव जाधव यांनी शाळेत विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, डिजिटल अध्यापन, वाचन-लेखनविषयक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. शाळेतील भौतिक सुविधांची पूर्तता आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यातून शाळेच्या विकासाला चालना मिळाली आहे.
पालकांचे सहकार्य आणि समाजसहभागातून शाळेच्या विकासाला नवी दिशा देत विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ तसेच स्थानिक संस्थांच्या सहकार्याने विविध विकासकामे आणि शैक्षणिक उपक्रमांना गती मिळाली.
शैक्षणिक गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नवोपक्रमशीलता आणि सामाजिक बांधिलकी या कार्याची दखल घेत जाधव यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून झालेली निवड ही किंजवडे शाळेसह देवगड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिक्षण विभाग, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, सरपंच, ग्रामपंचायत, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.













