राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित, राजापूर या संस्थेला रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी सदिच्छा भेट देत संस्थेच्या कामकाजाची व प्रगतीची माहिती जाणून घेतली.
यावेळी राम कुलकर्णी यांनी संस्थेच्या विविध कामकाजाची, कार्यपद्धतीची तसेच संस्थेच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली. संस्थेची प्रगतीशील वाटचाल पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक केले.
सहकार क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचा विचार करता संस्थेने आधुनिक कार्यपद्धती, पारदर्शकता, सभासदाभिमुख सेवा आणि सक्षम प्रशासन यावर अधिक भर देऊन संस्थेची उन्नती साधावी असे सांगितले. संस्थेच्या भविष्यातील विकासासाठी आवश्यक असणारे बदल, सुधारणा, नियोजन आणि प्रभावी कार्यपद्धती याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
काळानुरूप बदल स्वीकारत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सभासदांना अधिक दर्जेदार, सुलभ व तत्पर सेवा उपलब्ध करून द्यावी. तसेच सहकाराच्या माध्यमातून संस्थेची विश्वासार्हता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत संस्था विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे दिसून येते, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांची सदिच्छा भेट आणि त्यांचे मार्गदर्शन हे कुणबी पतपेढीच्या आजच्या प्रगतीसोबतच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने निश्चितच मोलाचे, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारे आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांची राजापूर तालुका कुणबी पतपेढीला सदिच्छा भेट













