देवरूख (प्रतिनिधी)
कर्नाटकातील जे. एस. एस. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, म्हैसूर येथे ३९व्या दक्षिण-पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करून अव्वल स्थान मिळविले. मुंबई विद्यापीठाने संगीत, नाट्य, नृत्य या तीन प्रमुख विभागांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. युवा महोत्सवाच्या एकूण पाच विभागीय गटात ७६ गुणांची कमाई करत मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेत बाजी मारली. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील ३५ विद्यापीठानी सहभाग घेतला होता. संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला या पाच विभागातील २८ स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन २५ पारितोषिके प्राप्त केली.
ललित कला अर्थात फाईन आर्ट या कलाप्रकारांसाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देवरुखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि विश्वविख्यात रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे व केशर चोपडेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मुंबई विद्यापीठ संघाला श्री. विलास रहाटे गेली तीन वर्ष मार्गदर्शन करत असून, त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिके प्राप्त केली आहेत. श्री. विलास रहाटे यांनी आपल्या विद्यार्थीदशेत आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाकडून सलग तीन वर्ष सहभागी होऊन मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके प्राप्त केली आहेत.
श्री. विलास रहाटे व श्री. केशर चोपडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज चव्हाण यांनी रांगोळी व कोलाज कामामध्ये, तर प्रथमेश म्हात्रे यांनी क्ले मॉडलिंग अर्थात मातीकाम या कला प्रकारात राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. तसेच या दक्षिण-पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात प्रथमेश म्हात्रे याने पोस्टर मेकिंग या कला प्रकारात चमकदार कामगिरी करून मुंबई विद्यापीठचा नावलौकिक वाढविला आहे. श्री सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, चेन्नई येथे १० मार्च ते १४ मार्च या कालावधीत “३९व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव: २०२५-२६” आयोजित करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या यशामागे माजी विद्यार्थी व राष्ट्रीयस्तरावरी विजेत्या मार्गदर्शकांचे योगदान महत्त्वाचे ठरले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांनी स्पर्धेचे नियोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल, तसेच सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या संघातील सर्व विद्यार्थी व मार्गदर्शकांचे कुलगुरू प्रा. (डॉ) रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय युवा महोत्सवातील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.












