बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत १० ऑक्टोबरला ‘स्वरसंध्या’चे आयोजन

सुप्रसिद्ध गायक अमल ठाकूर, प्रशांत धोंड, प्रफुल्ल वालावलकर यांचे सदाबहार गीतांचे सादरीकरण

 

कुडाळ :     नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवार, १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘स्वरसंध्या’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक व संगीतकार अमल ठाकूर, प्रशांत धोंड आणि प्रफुल्ल वालावलकर विविध सदाबहार गीतांचे सादरीकरण करणार आहेत.

 

या संगीत मैफलीला ऑर्गनवर मंदार जोशी, तर हार्मोनियमवर राजन नाईक, प्रसाद नाईक आणि आदित्य आचरेकर साथ करणार आहेत. तसेच पखवाज व तबल्याची साथ रजत गाळवणकर आणि सिद्धेश कुंटे करणार आहेत.

 

संगीतप्रेमींसाठी ही सुरेल मैफल पर्वणी ठरणार असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहून सदाबहार गीतांचा आनंद घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.