योग्य मार्गदर्शनाने दर्जेदार बुद्धिबळपटू तयार होतील – विक्रमी बुद्धिबळपट्टू शरद वझे

तळवडे विद्यालयात पार पडली शालेय विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ कार्यशाळा

संतोष कोत्रे
लांजा : योग्य मार्गदर्शन व शास्त्रीय पद्धतीने खेळात सातत्य राखल्यास ग्रामीण भागातून भविष्यात दर्जेदार बुद्धिबळपटू तयार होतील, असा विश्वास विक्रमी बुद्धिबळपट्टू, चॅलेंजर बुद्धिबळ अकॅडमी मुंबई चे अध्यक्ष शरद वझे यांनी तळवडे येथे व्यक्त केला. शहरी भागापुरते मर्यादित असलेल्या बुद्धिबळ या खेळाला प्रोत्साहन मिळावे, ग्रामीण भागातूनही बुद्धिबळपट निर्माण व्हावेत या उद्देशाने ज. गं. पेडणेकर माध्यमिक विदयालय तळवडे येथे अनोखी एकाच वेळी अनेक विदयार्थाशी खेळता येणारी ‘सायमल’ प्रकारची स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी सलग पाच तास, श्री. वझे यांच्यासोबत १०० विद्यार्थ्यांचा सामना रंगला. कार्यक्रमाचे उद्घाटन शरद वझे यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमाला मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, चेस अकॅडमीच्या सदस्या सुजाता वाघधरे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होता. बुद्धिबळ या खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी चॅलेंजर चेस ॲकॅडमीची स्थापना करून श्री. वझे यांनी गरजू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्याचा कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. दोनदा विश्वविजेता बनलेल्या विश्वनाथन आनंदच्या पराक्रमाला सलाम म्हणून त्यांनी देशातील शाळा शाळांमधून जाऊन एकाच वेळेस अनेक खेळाडूंशी खेळण्याचा चंग बांधला आहे. यावेळी पेडणेकर विद्यालयातील विद्यार्थासोबत शिक्षकांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत खेळण्याचा अनुभव शिक्षकांनीही घेतला. बुद्धिबळ खेळातील तयारी नुसार विद्यार्थाना अॅडव्हान्स, बेसिक आणि क्लासिक कॅटगरी देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, नेहा पाटोळे, गणेश झोरे, स्वरा वासुरकर, श्वेता सावंत, विवेक किल्लेदार, अक्षता सावंत, शुभम पाटोळे, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश झोरे यांनी केले. दरम्यान यादिवशी तळवडे शिक्षणोतेजक संस्था मुंबई स्थानिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे, उपाध्यक्ष संजय पाटोळे, लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, स्थानिक संस्था सदस्य सुधाकर पाटोळे, महमद पावसकर, नीलम पाटोळे, प्रदिप पाटोळे, उदेश कदम, नंदकु‌मार पाटोळे, शाळा समिती सदस्य विजय पाटोळे, प्रकाश पाटोळे, नारायण कदम आदींनी प्रशालेला भेट दिली व उपक्रमात सहभागीचे कौतुक केले.