खांबडवाडी मित्र मंडळ, गोळवशी च्या वतीने ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन

लांजा (प्रतिनिधी) :  तालुक्यातील गोळवशी गावातील खांबडवाडी मित्र मंडळाच्या वतीने ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाचे हे २९ वे वर्ष असून या निमित्ताने विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरे करण्यात येणार आहे. गेल्या २८ वर्षांपासून गावातील नागरिक व परिसरातील भाविकांच्या सहभागातून हा उत्सव सातत्याने साजरा केला जात आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे आगमन, दैनंदिन पूजा-अर्चा व आरती, भजन यांसह विविध सामाजिक, सांस्कृतिक व विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी गुणगौरव, मनोरंजक खेळ, समाजप्रबोधनपर कार्यक्रम, भजनाचे डबलबारी सामने, वेशभूषा स्पर्धा, महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच रास-गरबा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
मंडळाचे हितचिंतक तसेच गावातील आणि मुंबईस्थित ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्सवाच्या काळात दररोज महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या नवरात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खांबडवाडी मित्र मंडळ, गोळवशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.