खेडमध्ये २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान श्रीकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची उपस्थिती; धार्मिक विधी, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील गुरवआळी येथील दशानेमा मुरली मनोहर मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी, महापूजा, महाआरती, कलश मिरवणूक, छबिना, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा रामदास कदम यांच्या शुभहस्ते कलशारोहणाचा मुख्य सोहळा होणार असल्याने या धार्मिक कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दशानेमा मुरली मनोहर मंडळ, खेड आणि दशानेमा मुरली मनोहर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित या धार्मिक उत्सवात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर पवित्र अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता श्रीगणेश पूजन, सकाळी ९ वाजता उदकशांती आणि सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत होमहवन व विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. दुपारी १२.३० वाजता महाआरती झाल्यानंतर दुपारी १ ते २.३० या वेळेत भाविकांसाठी प्रसादाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ६ वाजल्यापासून भव्य कलश मिरवणूक व छबिना काढण्यात येणार असून, रात्री भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. २४ ऑक्टोबर हा सोहळ्याचा मुख्य दिवस असणार आहे. या दिवशी श्रीकृष्ण मंदिरातील कलशारोहणाचा धार्मिक विधी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भगवंताला छप्पन भोग अर्पण करण्याचा विशेष कार्यक्रमही होणार असून, त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष सन्मान सोहळा पार पडणार आहे.
रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्रीसत्यनारायणाची महापूजा होणार आहे. दुपारी १२ ते २.३० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री भोजनानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष सन्मान सोहळा होणार आहे. सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ ते ६.३० या वेळेत काकड आरतीने या धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे.
श्रीकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने गुजरअळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. धार्मिक विधी, श्रीकृष्ण दर्शन, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन दशानेमा मुरली मनोहर मंडळ आणि दशानेमा मुरली मनोहर महिला मंडळ, खेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.