वैभववाडी प्रतिनिधी :
उंबर्डे मोपेरकरवाडी येथील विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालय ओरोस येथे मृत्यू झाला. मदन मनोहर कदम वय २८ असे मयत तरुणाचे नाव आहे.
मयत मदन कदम हा आपल्या वडिलांसोबत राहत होता. मजुरी करून तो उदरनिर्वाह करीत होता. दिनांक ६ ऑक्टोबर रोजी दुपारी त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे व त्यानंतर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलवण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी त्याच्यावर उंबर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्याच्या आत्महत्या मागचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.













